- मेघना ढोके
‘दीदी, बहोत कोशीश करते है लोगोंको समझाने की, हम तो इंडियन है, पर वो नहीं मानते! मै निकल आया दिल्लीसे, अब मालूम नहीं, मै कब वापस जा पाऊंगा!’- इंफाळपासून जवळच असलेल्या लोकताक गावात राहणारा बिष्णूसिंग फोनवर सांगत होता. लोकताक हे आशियातलं सर्वात मोठं गोड्या पाण्यातलं सरोवर, इथल्या झुलत्या वेली पाहायला लांबून माणसं येतात, तेव्हा त्यांना दिसतो मणिपुरातला कित्येक दिवस चालणारा कर्फ्यू, बंद. रस्ते ओस. दुकानं बंद. किराणा दुकान आणि मेडिकल स्टोअर फक्त हाफशटर उघडे. मिल्ट्रीचा पहारा. घराबाहेर पाऊल टाकलं कफ्यरूत तर समोर बंदुक घेऊन आर्मीचा जवान. कुणी काही जास्त बोललं, ऐकलं नाही तर गोळी घातली जाण्याचं भय. तसा विशेषाधिकार तिथं सैन्याला आहेच, ‘अफ्सा’ नावाचा. त्यामुळे कफ्यरू, बंदमध्ये बंद दाराआड राहणं बिष्णूला आणि त्याच्या ईशान्येतल्या मित्रांना काही नवीन नाही. त्यांचा जन्मच अशा वातावरणात झाला आणि जगणं कायम धुमसतंच. त्यातून वाट काढायची तर ही मुलं दिल्ली, कोलकाता, बंगलोर, मुंबई गाठतात. तिथंही वांशिक भेदभाव वाट्याला येणं ही नवी गोष्ट नाही. चिनी, चिंकी, नेपाळी, मिचमिची. हे सारे शब्द सर्रास त्यांना उद्देशून वापरले जातात. हे शब्द वांशिक घृणा दर्शवतात हे भल्याभल्यांच्या गावीही नसतं.आता मात्र या मुलांना चक्क ‘कोरोना’ म्हणून हाका मारणं सुरु झालं आहे.‘ए कोरोना व्हायरस, चल, निकल जा, चीन जा.’- असं बिष्णूला ऐकायला लागल्यावर त्याच्या मनाला काय यातना झाल्या असतील? पण तो काही एकटा नाही. दिल्लीत गेल्या पंधरा दिवसांत या घटना सर्रास घडल्या. मिझोराम, मणिपूर, नागालॅण्ड, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यात राहणार्या मंगोलियन चेहरेपट्टीच्या अनेक विद्यार्थ्यांना असाच अनुभव आला. ‘कोरोना’ म्हणून त्यांची टर उडवण्यात आली. कुणी टवाळ एकटदुकट असतील म्हणून सुरुवातीला या घटनांकडे दुर्लक्ष करण्यात आलं, मात्र आता हे प्रमाण फार वाढलं आहे. अनेक मुलं पालकांना घरी फोन करुन सांगू लागलेत की, वातावरण बिघडतं आहे, आम्हाला ‘कोरोना’ म्हणून चिडवलं जातंय. काहीजण वेळीच अंदाज घेऊन घरीही परतले.अलीकडचीच घटना. दिल्लीत गोैरव व्होरा नावाचा माणूस एका मणिपूरी मुलीच्या अंगावर थुंकला. त्याला आता अटक झाली आहे. कोलकात्यात एका बाईचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यात दुकानदार तिला ‘चिनी’ म्हणत किराणा नाकारत होता. बंगलोरच्या एका नर्सची पोस्ट सोशल मीडीयावर फिरतेय. ती म्हणते, ‘मी दिवसा कोरोना रुग्णांची ‘पीपीई सुट’ घालून काळजी घेते. त्यापायी आम्ही दिवसदिवस जेवण तर सोडाच लघवीलासुद्धा जात नाही, कारण तसं केलं तर पुन्हा अंघोळ, सुट काढणं-घालणं करावं लागेल, तेवढी उसंतच नाही. पण मी सकाळी कामाला निघते तर लहानगी मुलं मला ‘ए कोरोना, ए कोरोना’ म्हणून हाका मारतात. हे विष त्यांच्या डोक्यात कुणी कालवलं?’- अर्थात मोठय़ांनीच! एरवी जे राष्ट्रभक्तीच्या आणि सामाजिक जाणिवांच्या गप्पा मारतात तेच हे मोठे. बिष्णूचा दिल्लीतच अडकून पडलेला मित्र मोंगोय व्ही फोनवर सांगत होता, ‘आम्हाला भाजी घ्यायला जाता येत नाही, लगेच भाजीवाले आणि तिथले लोक म्हणतात, ‘तुम लोग तो सापबिच्छू खाते हो, तुम्हारी वजहसे कोरोना फैला! आम्ही चिनी आहोत का? आम्हाला का सुळावर चढवताय?’अशा वातावरणात दिल्लीसह तमाम महानगरांत ही मुलं कशी जगत असतील? लहानशा घरात किती जण दाटीवाटीने राहत, काय खात असतील याचा विचारही करवत नाही. विशेषत: चायनिज गाड्यांवर काम करणारी मुलं. त्यांचं काय झालं असेल?लिओ रायखन नावाच्या मुंबईत राहणार्या मणिपुरी मुलानं नुकतीच एक पोस्ट व्हॉट्सअँपला पाठवली. त्यात तो म्हणतो, इथं महाराष्ट्रात राहणार्या ईशान्य भारतीयांपैकी 90 टक्के लोकांचं पोट हातावर आहे. रोज कमवायचं, रोज खायचं. असंघटित क्षेत्रात आम्ही काम करतो. हॉटेल्स, रेस्टॉरण्ट, चायनिज गाड्या, स्पा, सलून, मॉल. ते सगळं बंद झालं. काम नाही हाताला. भाड्याच्या घरात राहतो. घरभाडं कसं भरणार यापुढे? मालक लोक हेच ओळखून तगादा लावायला लागलेत. आता आम्ही घर सोडून आमच्या गावीही जाऊ शकत नाही, कारण लॉकडाऊन आहे. त्यात आम्हाला शिव्या घालणं, ‘कोरोना’ म्हणणंही सुरु झालं आहे!’तो मणिपुरातल्या तांखुल जमातीचा. मणिपुरात कर्फ्यू, बंद पाहतच ही मुलं मोठी झाली, त्याचं त्यांना भय वाटत नाही, पण आता इथंही जगणं पेचात पकडणार या भावनेनं तो आणि त्याचे दोस्त हवालदिल झालेले दिसतात. त्यांच्यासमोर प्रश्न आहे, पुढे काय?आणि हे सारं सुरु असताना देशारात स्वत:ला सुज्ञ म्हणवणारे लोक, या आपल्याच माणसांना छळू लागलेत. त्यात सोशल मीडीयावर लिहिणारे काही नामवंत पत्रकार आणि जाणकारही मागे नाहीत. ‘आसाममध्ये पहा, कसे प्लास्टिक गुंडाळून डॉक्टर उपचार करताहेत’ म्हणून काही पत्रकार फेसबुकवर पोस्ट लिहितात, पण ती खरी की खोटी याची खातरजमा करत नाही. ती फेकन्यूज सर्रास व्हायरल होते आणि हे तज्ञ आपण कसे सरकारला धारेवर धरत गरिबांचे कैवारी म्हणून ‘लाईक्स’ घेत बसतात. काहीजण त्याहून थोर. त्यांना चीनचा नकाशा माहिती नाही हे मान्य, पण आपल्या देशाचा भुगोलही ते माहीत करुन घेत नाहीत. अशा अनेकांनी फेसबुक आणि व्हॉट्सअँपवर पोस्ट्स फिरवल्या की, ‘पाहा, आपलं सरकार किती भारी! त्यांच्यामुळे चीनला इतक्या चिकटून असलेल्या इशान्य भारतात कोरोना पोहोचला नाही!’ काहींनी तर ‘अरुणाचल प्रदेश चीनला कसा चिकटून आहे आणि तरी तिथे सरकारनं उत्तम काम केल्यानं कोरोना पसरला नाही’ असे तारे तोडले! या लोकांनी लिहिण्यापूर्वी निदान अरुणाचलचा, चीनचा नकाशा तरी पाहावा. त्या देशाचा आकार, आपली सीमा जिथं आहे, तिथलं मैलौन्मैल घनदाट अरण्य, बर्फाळ भाग, लोकवस्ती, बॉर्डरवर आदानप्रदान अजिबात नाही हे तरी माहिती करुन घ्यावं. मात्र अशी तसदी न घेता, फॉरवर्ड मारणारे उत्साहीच जास्त.या सार्याचा परिणाम ईशान्य भारतीय माणसांवर होतो. माणसांच्या जगण्यामरण्याच्या, मानअपमानाच्या आणि उपजिविकेच्या प्रश्नांचे जाच त्यांना या सार्यापायी काचायला लागतात.खरंतर आपल्याच देशातली जी माणसं अखंड लॉकडाऊन, कर्फ्यू, बंद, अनिश्चितता यांच्यात जगत आहेत, त्यांच्याविषयी खर्या अर्थानं सह-वेदना जाणवावी असे दिवस दुर्दैवानं का होईना, उर्वरित भरताच्या वाट्याला आलेत. कोंडलेपणाचा हा अनुभव जगण्याची रीत बदलून टाकतोय. अशावेळीही जर तथाकथित पोकळ वांशिक अभिमान आपल्याला आपला मानव-धर्म आणि माणुसकी सोडायला लावत असेल तर आपण कुणीच देशभक्तीच्या बाता न मारलेल्या बर्या.
साध्या अपेक्षा
ईशान्य भारतातल्या बांधवांसाठी आपण उर्वरितांनी काय करावं,अशी त्यांची अपेक्षा आहे?1. आपण सगळे एक आहोत, हे आता तरी मान्य करा. आम्ही चिनी आहोत हे मनातून काढून टाका, आम्ही भारतीयच आहोत, हे स्वीकारा.2. आर्थिक मदत करा अशी अपेक्षा नाही. निदान हे कोरोना, चिनी, नेपाळी म्हणणं तरी सोडा. तुम्हाला गंमत वाटते पण आमच्या काळजाला घरं पडतात. आत्मविश्वास मोडून पडतो. परकेपणाचं भय वाढतं3. आसपासच्या चिनी गाडीवर काम करणारी तरुण मुलं कुठं आहेत, याची घरबसल्या चौकशी करा. एखाद्याला फोन करुन विचारा, काही मदत हवी का?4. ज्याला गरज असेल त्याला तुम्ही जे खाता, तेच डबा म्हणून द्या.5. आणि भरवसा ठेवा, आम्ही तेवढेच भारतीय आहोत, जेवढे तुम्ही आहात.
meghana.dhoke@lokmat.com(लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)