लसीकरणासाठी सक्तीची गरज का पडावी?
By किरण अग्रवाल | Published: December 12, 2021 07:07 AM2021-12-12T07:07:07+5:302021-12-12T07:10:06+5:30
Corona Vaccination : अकोला, बुलडाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
- किरण अग्रवाल
कोरोना गेला गेला म्हणता ओमायक्रॉनचे नवे संकट दारावर धडका देत आहे. घाबरण्याचे कारण नाही, मात्र खबरदारीचा भाग म्हणून लसीकरण गरजेचे आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे, ती तातडीने वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी सक्ती केली जाण्यापूर्वी स्वयंस्फूर्तता दाखविली जायला हवी.
सार्वजनिक आरोग्याबद्दल सरकारी यंत्रणांच्या अनास्थेवर नेहमी टीका होत असते, परंतु व्यक्तिगत पातळीवरही आपल्या जीविताला असलेल्या धोक्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्यासाठी सक्ती करण्याची वेळ येते तेव्हा आश्चर्य वाटून गेल्याखेरीज राहत नाही. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबतही तेच दिसून येते. दुर्दैव असे की, सक्ती वा अडवणूक करूनही यासंदर्भात म्हणावे तितके गांभीर्य बाळगले जाताना दिसून येत नाही.
दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याचे बोलले जात असताना सरकारी पातळीवरून वेगाने राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेमुळे ही लाट थोपविण्यात यश आले. खबरदारीचा उपाय म्हणून उभारण्यात आलेले कोविड सेंटर्स ओस पडले व सरकारी रुग्णालयातील सक्रिय रुग्णांची संख्याही घसरली, यामुळे समाधानाचा सुस्कारा टाकला गेला, परंतु याचा अर्थ कोरोना गेला असे अजिबात नाही. लोकांनी मात्र कोरोना संपला असाच गैरसमज करून घेत त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध झुगारून लावले, तसेच खबरदारीच्या उपायांकडेही दुर्लक्ष केले. एका सर्वेक्षणानुसार गेल्या नोव्हेंबर महिन्यात तर अवघे दोन टक्केच लोक नित्यनेमाने मास्क वापरत असल्याचे आढळून आले. स्वतःचे आरोग्य व संरक्षणाबाबतची ही बेफिकिरीच नव्या संकटास निमंत्रण देणारी ठरली तर आश्चर्य वाटू नये.
कोरोनाच्या डेल्टा विषाणूपासून काहीसी सुटका होत नाही तोच आता ‘ओमायक्राॅन’चे संकट घोंगावत आहे. कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्रातही हा नवा विषाणू दाखल झाला आहे. अभ्यासकांच्या मते त्याचा संसर्ग फैलावण्याचा वेग हा कोरोनापेक्षा अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जाणे स्वाभाविक आहे. पण त्यावरही लसीखेरीज दुसरा उपाय तूर्त समोर आलेला नाही. नवीन विषाणू हा धोकादायक आहेच, परंतु लसीकरण झाले असेल तर तो धोका टळू शकतो. या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या मोहिमेला आणखी वेग देण्यात आला आहे. ‘हर घर दस्तक’ नामक मोहीम त्याकरिता राबविली जात आहे, परंतु विशेषत: लसीचा दुसरा डोस घेण्याबाबतचा टक्का खूप कमी असल्याचे आढळून आले आहे.
अकोला जिल्ह्याचा विचार करता राज्यातील ३५ जिल्ह्यांच्या क्रमवारीत अकोल्याचा नंबर तब्बल २४ व्या क्रमांकावर आहे. अकोला जिल्ह्यात दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या अवघी सुमारे ३५ टक्के इतकीच आहे. महत्त्वाचे म्हणजे अजूनही सुमारे चार लाख लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही, म्हणजे साक्षात संकटाला काखोटीस मारून हे लोक फिरत आहेत. बुलडाणा जिल्हाही २१ व्या क्रमांकावर असून, तेथे ३७़ ८ टक्के लोकांनीच दुसरा डोस घेतलेला आहे, तर वाशिम १८ व्या स्थानी असून ४७.८ टक्के लोक पूर्ण लसीकृत आहेत. संपूर्ण वऱ्हाड दुसऱ्या डोसबाबत ५० टक्क्यांच्या आत आहे, त्यामुळे ‘ओमायक्राॅन’पासूनही वाचायचे असेल तर लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणे गरजेचे बनले आहे. सरकारी यंत्रणा त्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. सुटीच्या दिवशी म्हणजे रविवारीही लसीकरण केले जात असून, त्यासाठीचा वेळही वाढवून देण्यात आला आहे, परंतु तरी उद्दिष्ट गाठण्यात अडचणी येत आहेत.
लसीकरणाची अपरिहार्यता पाहता मागे याबाबतची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भाने लसीकरण न करणाऱ्यांना काही लाभांपासून वंचित ठेवण्याचे निर्णयही घेण्यात आलेत, तरीदेखील फारसा फरक पडला नाही. त्यामुळे आता वाशिमसारख्या जिल्ह्यात लस न घेतलेल्यांवर धडक कारवाई करत दंड आकारला जात आहे. या कारवाईबद्दल भलेही कुणाचे दुमत असू शकेल, पण स्वतःच्या जीवाची काळजी न घेणारे इतरांच्या जीवासाठीही धोका ठरत असतील तर अशी सक्ती करण्याशिवाय मार्गही कोणता उरावा?
सारांशात, धोका दारात येऊन ठेपलेला असला तरी लसीकरणाखेरीज तूर्त तरी त्यावर इलाज नाही, याच सोबत घराबाहेर पडताना मास्कचा वापर केला जाणे अपरिहार्य बनले आहे. गर्दी करायला तर नकोच, शिवाय गर्दीच्या ठिकाणी जाणेही टाळायला हवे. कोरोना गेलाय या भ्रमात न राहता शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळून स्वतःच स्वतःची खबरदारी घ्यायलाच हवी.