पावनखिंड'मध्ये बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पुरकर यांची न्यू इनिंग, म्हणाले- यावर्षा अखेरपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 07:00 AM2022-08-21T07:00:00+5:302022-08-21T07:00:02+5:30
‘पावनखिंड’ या ऐतिहासिक सिनेमात अजय पूरकर यांनी‘बाजीप्रभू देशपांडे’ या मध्यवर्ती भूमिका साकारली होती.
नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका या माध्यमांतून घरोघरी पोहोचलेल्या आणि चोखंदळ रसिकांनी वाखाणलेल्या दर्जेदार मराठी अभिनेत्यांमधील एक आघाडीचे नाव म्हणजे अजय पूरकर. अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात उत्तम गती असलेल्या अजय पूरकर यांचे नाव अनेक गाजलेल्या कलाकृतींशी जोडले गेलेले आहे. असंभव, अस्मिता, तू तिथे मी, मुलगी झाली हो अशा अनेक मालिका, कोडमंत्र, नांदी यांसारखी उत्कृष्ट आणि वेगळ्या विषयांवरची नाटके आणि बालगंधर्व, फर्जंद, फत्तेशिकस्त, मुळशी पॅटर्न, पावनखिंड यांसारखे भव्य चित्रपट त्यांच्या अभिनयक्षमतेची साक्ष देतात. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटाने ५० कोटी रूपयांचा व्यवसाय करून मराठी प्रेक्षकांना परत एकदा चित्रपटांची गोडी लावली, की ज्यात ‘बाजीप्रभू देशपांडे’ या मध्यवर्ती भूमिकेत अजय पूरकर होते.
इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर, अजय पूरकर यांनी निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी नुकतीच ‘जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स’ ही निर्मितीसंस्था स्थापन केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती चाहत्यांनी दिली आहे.
अजय पूरकर यांची पोस्ट
१५ वर्षांच्या नाटक, मालिका आणि सिनेमा क्षेत्रामध्ये अभिनयाचा अनुभव घेतल्यानंतर आता मी पदार्पण करतोय..घेऊन येत आहे जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स ..या संस्थेद्वारा नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, चित्रपट आणि OTT प्लॅटफॉर्म साठीसुद्धा चित्रपट मालिका यांचीसुद्धा निर्मिती होणार आहे. यावर्षा अखेरपर्यंत अभूतपूर्व आणि भव्य निर्मितीची घोषणा करणार आहे .आपणां सर्व रसिक प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम माझ्या पाठीशी राहूदेत.
आपल्या मातीतील तरूण प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञ शोधून उच्च दर्जाचे मराठी चित्रपट तयार करणे, हा ‘जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स’चा प्रमुख हेतू आहे. संस्थेतर्फे फक्त मराठी, हिंदी याच भाषांमधून निर्मिती न करता, इतर प्रमुख भारतीय भाषांमधूनही निर्मिती केली जाणार आहे.