चित्रपट, मालिका, नाटक यांचे प्रमोशन करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला जातो. अमर फोटो स्टुडिओ या नाटकाच्या प्रमोशनच्या वेळी तुमचे बालपणीचे फोटो टाकून आपल्या मित्रांना टॅग करा असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी दादा, मी प्रेग्नंट आहे या नाटकाचे देखील सोशल मीडियाद्वारे प्रमोशन करण्यात आले होते. असाच प्रमोशन फंडा सध्या सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहे.
प्रसाद ओकने सकाळी फेसबुकला पोस्ट केलेली एक पोस्ट लोकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. प्रसादने ही पोस्ट का टाकली आहे अशी चर्चा सुरू असतानाच निखिल राऊत, चिन्मय मांडलेकरने देखील काहीच तासांत ही पोस्ट टाकली. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीशी संबंधित असणाऱ्या अनेक जणांच्या फेसबुक पेजवर ही पोस्ट पाहायला मिळाली. प्रसाद ओक, निखिल राऊत यांसोबत अनेकांनी नुकताच एक संदेश सोशल मीडियावर टाकला आहे. त्यांनी त्यात लिहिले आहे की, ऑनलाईन मागवलाय... नव्या वर्षांत येतोय आणि यासोबत त्यांनी व्हॅक्यूमक्लिनर असा हॅशटॅग दिला आहे. मराठी चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेली अनेक मंडळी हेच पोस्ट फेसबुकवर टाकत असल्याने हे कोणत्या तरी चित्रपटाचे, नाटकाचे अथवा मालिकेचे प्रमोशन आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. या प्रोजेक्टचे नाव व्हॅक्यूमक्लिनर या नावाशी संबंधित असेल असा देखील तर्क सोशल मीडियावर लावला जात आहे. पण हे कशाचे प्रमोशन आहे हे अद्याप तरी कळलेले नाही.
प्रसाद ओक, निखिल राऊत यांसोबतच अनेकांनी ही पोस्ट फेसबुकला शेअर करताना चिन्मय मांडलेकर, राहुल रानडे, दिलीप जाधव, प्रणित बोडके या चित्रपटसृष्टीतील मंडळींना टॅग केले आहे. यावरून या प्रोजेक्टशी या सगळ्यांचा संबंध असल्याचे नक्कीच लक्षात येत आहे. पण हे प्रोजेक्ट काय आहे हे कळण्यासाठी आपल्याला काही दिवस तरी वाट पाहावी लागणार यात काहीही शंका नाही. नवीन वर्षांत येतोय असा या पोस्टमध्ये उल्लेख असल्याने या प्रोजेक्टची घोषणा नवीन वर्षांत होईल असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.