- शिवाजी गोरे
पुणे - विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गट राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुण्यातील भवानी पेठ भागात असलेल्या काशिवाडी झोपडपट्टीत राहणा-या सलमान अनवर शेखने फ्लायमध्ये ४९ ते ५२ किलो वजन गटात मिझोरामच्या खेळाडूचा पराभव करून आपल्या कारकीर्दीतील पहिले राष्ट्रीय विजेतेपद जिंकले.
क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानच्या अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील बॉक्सिंग क्लबमध्ये विजय गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली २००२ पासून सराव करणा-या सलमानने उपांत्यपूर्व फेरीत सेनादल, उपांत्यफेरीत हरियाना संघांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. रेल्वेकडून खेळत असलेल्या सलमानने अंतिम फेरीत मिझोरामच्या लाल दीमावई याचा ५-० गुणांनी पराभव करून विजेतेपदावर आपला हक्क प्रस्तापित केला. पुना कॉलेजमध्ये १२ वीपर्यंत शिक्षण झालेल्या सलमानला मोहल्यामध्ये खूप भांडण व मारामारी करायचा म्हणून वडील अनवर शेख यांनी गुजरसरांकडे बॉक्सिंगच्या सरावासाठी टाकले.
गेल्या अनेक वर्षांच्या त्याच्या कष्टाचे फळ त्याला मिळाले. महाराष्ट्रीय पुण्याच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. राष्ट्रीय स्पर्धेत त्याचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न त्याचे पूर्ण झाले. या पदकासाठी त्याने अनेक वर्षापासून कष्ट घेतले आहेत.
मार्गदर्शक विजय गुजर
लहानपणी खूप भांडणे व मस्ती करायचा. त्याचे डोके शांत राहो म्हणून त्याला गुजरसरांकडे पाठविले होते. कारण आम्ही ज्या काशिवाडीत राहतो तेथे चोवीस तास भांडणे व मारामाºया होत असतात. गुजरसरांकडे सरावाला गेल्यापासून त्याला या खेळाची आवड लागली आणि त्याच्या मेहनतीला आज यश आले. सलमानने गेले काही वर्ष मुष्टीयुद्धमध्ये खूप पदके जिंकली. पण हे पदक त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
वडील अनवर शेख
स्वप्नपूर्ती
राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद जिंकण्याचे माझे स्वप्न आज पूर्ण झाले. या पदकासाठी मी गेले अनेक वर्ष प्रयत्नशिल होतो. पण आज दिवस माझा असल्यामुळे मला यश आले. सेनादल, झारखंड, मध्यप्रदेश या खेळाडूंविरूद्ध खेळतांना मी विजय नोंदविला. पण अंतिम फेरीत मिझोरामच्या खेळाडूविरूद्ध खेळतांना आज माझ्या शरीरानेसुद्धा साथ दिली. आज मी अंतिम लढत ५-० गुणांनी जिंकली आहे. पण हे गुण मिळवितांना मिझोरामच्या खेळाडूला शेवटपर्यंत खेळवत राहिलो. त्याच्या पंचचा बचाव करून त्याला हुलकावणी देत ठोसा मारून गुण मिळविले. आज मला संपूर्ण स्पर्धेत म्हणावा तसा दमही लागला नाही. त्यामुळे हे विजेतेपद जिंकले. यामागे माझे गुरू विजयसर, घरचे सर्व यांचे आशिर्वाद व पाठिंबा आहे.