मुंबई : महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाच्या परळ भोईवाडा परिसरात बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्र संघर्ष मनोरंजन मैदानात १ हजार १५० मीटर्सच्या सायकल ट्रॅकचे सुशोभीकरणासह नूतनीकरण नुकतेच करण्यात आले. तसेच या मैदानात असणा-या ‘जॉगिंग ट्रॅक’चे नूतनीकरणदेखील करण्यात आले आहे.नुकत्याच महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या अनौपचारिक कार्यक्रमाला आमदार कालिदास कोळंबकर, नगरसेविका सुप्रिया सुनील मोरे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात सायकल चालविणे व पायी चालणे याचे आरोग्यदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांना सायकल चालविण्यासाठी आणि पायी चालण्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित जागा उपलब्ध व्हावी; यादृष्टीने महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाद्वारे १ किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या (१ हजार १५० मीटर) व १.२ मीटर रुंदीच्या सायकल ट्रॅकचे तसेच या मैदानातील मातीच्या ‘जॉगिंग ट्रॅक’चेदेखील नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर मोफत सायकल स्टँडदेखील सुरू करण्यात आले असून १४ सायकली ठेवण्याची सुविधा आहे.महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी कार्यक्रमाप्रसंगी केले आहे. या वेळी स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. महापालिकेच्या या मनोरंजन मैदानात सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, सायकल स्टँड यासह खुली व्यायामशाळा, योग सरावस्थळ यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या मनोरंजन मैदानामध्ये बटुवृक्षासह (बोन्साय) सुगंधी झाडेदेखील लावण्यात आली आहेत, अशीही माहिती किशोर देसाई यांनी दिली आहे.
भोईवाडा येथे १ हजार १५० मीटरचा सायकल ट्रॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 3:19 AM