गुणवत्ता यादीत १ ते २ टक्क्यांची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:08 AM2021-09-05T04:08:38+5:302021-09-05T04:08:38+5:30
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये कला आणि विज्ञान शाखेच्या कटऑफमध्ये १ ते २ टक्क्यांची घसरण दिसून आली ...
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये कला आणि विज्ञान शाखेच्या कटऑफमध्ये १ ते २ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे, तर काही नामांकित महाविद्यालयांत वाणिज्य शाखेच्या कटऑफमध्ये १ ते २ टक्क्यांची वाढ झाली आहे. नामांकित महाविद्यालयांमध्ये बहुतांश महाविद्यालयांचा कटऑफ कला, वाणिज्य आणि विज्ञान तिन्ही शाखांसाठी नव्वदीपारच आहे. त्यामुळे अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी चढउताराची असली तरी ८० टक्क्यांहून कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तिसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पहावी लागणार आहे.
बहुतांश विद्यार्थी हे केवळ नामांकित महाविद्यालयांची नावे पसंतीक्रमात देत आहेत. परंतु नामांकित महाविद्यालयांचा कटऑफ आणि त्या तुलनेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पाहता, अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या नियमित फेरीत प्रवेश मिळू शकलेला नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेले गुण आणि महाविद्यालयांच्या कट-ऑफचा अभ्यास करून अर्जात महाविद्यालयांचा पसंतीक्रम देणे किंवा बदलणे आवश्यक आहे. तरच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये पटकन ॲलॉट होऊ शकतील, असे मत प्राचार्य व्यक्त करत आहेत.
कला आणि विज्ञान शाखेच्या कटऑफमध्ये एका एका टक्क्याची घसरण झाली आहे. झेविअर्स, जयहिंद, साठ्ये, भवन्स, एनएम, मिठीबाई, रुईया या महाविद्यालयांत ही घट आहे. वाणिज्य शाखेचा विचार करता केसी, भवन्स, मिठीबाईसारख्या महाविद्यालयांत कटऑफमध्ये एका टक्क्याची वाढ झाली आहे.
नामांकित महाविद्यालयांचे कटऑफ
महाविद्यालय - कला -वाणिज्य - विज्ञान ( (सर्व आकडेवारी टक्क्यांमध्ये )
एचआर - ०- ९३- ०
केसी - ८७. २ - ९१. ४ - ८९
जयहिंद - ९१- ९१. ८ - ८८. ४
सेंट झेविअर्स - ९४ - ० - ९१
रुईया - ९२. ४-० - ९३. ४
पोदार - ० - ९२. ८ - ०
रूपारेल - ८७. २ - ९०. २ - ९१
साठ्ये - ७७. ८ - ८८. २- ८८. ४
डहाणूकर - ० - ९०. २ - ०
भवन्स - ७९. ४ - ८८. २ - ८७. ६
मिठीबाई - ८७- ९०. ६ - ८७. ४
एनएम - ० - ९३. ४ - ०
वझे केळकर - ९० - ९१. ६ - ९३
मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स - ०- ९२. २ - ०
बंदोडकर - ०- ० - ९३ . ४
सीएचएम - ७२ - ८५ - ९१. ६