राज्यात १.२७ लाख रेशन कार्ड होणार रद्द; एक घर एक रेशनिंग कार्ड योजनेंतर्गत कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 06:52 AM2023-06-11T06:52:46+5:302023-06-11T06:54:51+5:30

राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अशा शिधापत्रिका रद्द करण्याची कारवाई केली जात आहे.

1 27 lakh ration cards will be canceled in the state action will be taken under one house one ration card scheme | राज्यात १.२७ लाख रेशन कार्ड होणार रद्द; एक घर एक रेशनिंग कार्ड योजनेंतर्गत कारवाई होणार

राज्यात १.२७ लाख रेशन कार्ड होणार रद्द; एक घर एक रेशनिंग कार्ड योजनेंतर्गत कारवाई होणार

googlenewsNext

मनोज मोघे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात मे महिनाअखेर २ लाख ३२ हजार ७६६ रेशनिंग कार्ड डुप्लिकेट आढळली असून छाननीनंतर यातील १ लाख २७ हजार रेशनिंग कार्ड रद्द केली जाणार आहेत. सर्वाधिक २४ हजार ८२१ रेशनिंग कार्ड ही नागपूरमध्ये असून सर्वात कमी परभणी जिल्ह्यात ३८ इतकी आढळून आली. ‘एक घर, एक रेशनिंग कार्ड’ योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अशा शिधापत्रिका रद्द करण्याची कारवाई केली जात आहे.

रेशनिंग योजनेअंतर्गत स्वस्त दरात मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेण्यासाठी एका घरामागे चार-चार रेशनिंग कार्ड (शिधापत्रिका) काढली गेली असल्याची बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. ५ जून २०२३ पर्यंत राज्यात २ लाख ३२ हजार ७६६ डुप्लिकेट कार्ड असल्याचे आढळले. त्यानंतर करण्यात आलेल्या छाननीत १ लाख २७ हजार ८१० कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पिवळ्या व केशरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांच्या एका कुटुंबामागे सरकारने ठरावीक शिधा निश्चित केला आहे. एका घरामागे अनेक रेशनिंग कार्ड असल्याने गरज नसताना घरामागे दिल्या जाणाऱ्या शिध्याचे प्रमाणही वाढले होते. जर अंत्योदय योजनेअंतर्गत एका कार्डमागे ३५ किलो तांदूळ मिळत असेल तर घरामागे दिल्या जाणाऱ्या शिध्याचे प्रमाण ७० ते १०० किलो तांदूळ इतके वाढत होते. डुप्लिकेट कार्ड जाऊन सर्व कुटुंबातील सदस्य एकाच कार्डवर आल्याने घरामागे दिला जाणारा शिधाही कमी होणार असून त्याचा लाभ अधिक गरजवंतांपर्यंत पोहोचणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

सर्वाधिक डुप्लिकेट रेशनिंग असलेले जिल्हे

नागपूर        २४,८२१
जळगाव        ९,८९७
कोल्हापूर        ८,३३२
पालघर        ८,०३२
ठाणे        ७,२६८
नांदेड        ६,५३५


 

Web Title: 1 27 lakh ration cards will be canceled in the state action will be taken under one house one ration card scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई