Join us  

१.८० टक्क्यांची घट कुणाच्या पथ्यावर? राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांच्यात रंगला थेट सामना

By मनोज गडनीस | Published: May 22, 2024 4:04 PM

या लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेनेतर्फे राहुल शेवाळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर उद्धवसेनेतर्फे अनिल देसाई हे रिंगणात आहेत. राहुल शेवाळे २०१४ पासून येथून खासदार म्हणून निवडून गेले आहेत; मात्र २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीतील राजकीय चित्र वेगळे होते.

मुंबई : गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत यंदा मुंबईतील मतांची एकूण टक्केवारी जरी वाढली असली तरी मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात मात्र २०१९ च्या तुलनेत यंदा १.८० टक्क्यांची घट झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत येथे ५५.४ टक्के मतदान झाले होते तर सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत ५३.६० टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे ही घट नेमकी कुणाच्या पारड्यात विजयाचे दान टाकणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.या लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेनेतर्फे राहुल शेवाळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर उद्धवसेनेतर्फे अनिल देसाई हे रिंगणात आहेत. राहुल शेवाळे २०१४ पासून येथून खासदार म्हणून निवडून गेले आहेत; मात्र २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीतील राजकीय चित्र वेगळे होते. त्या दोन्ही निवडणुकांत राहुल शेवाळे हे तत्कालीन एकसंध शिवसेनेचे उमेदवार होते व त्यांची थेट लढत काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याशी झाली होती. मात्र, आता शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष आहे. या लोकसभा मतदारसंघात धारावी, वडाळा, सायन-कोळीवाडा हे सामाजिकदृष्ट्या कनिष्ट वर्गातील विधानसभा मतदारसंघ आहेत तर त्याचसोबत माहीम, चेंबूर आणि अणुशक्तीनगर हे पांढरपेशा वर्गातील विधानसभा मतदारसंघ देखील आहेत.गेल्यावेळी धारावी, वडाळा, सायन-कोळीवाडा या विधानसभा मतदारसंघातील मते शेवाळे आणि गायकवाड यांच्यात विभागली गेली असली, तरी माहीम, चेंबूर आणि अणुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघातून शेवाळे यांना चांगली मदत झाली होती. यंदा मात्र, अशी एकतर्फी मदत या तीन विधानसभा मतदारसंघातून होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसते. सोमवारी धारावी, वडाळा आणि सायन-कोळीवाडा येथील काही मतदान केंद्रांवर संथगतीने मतदान झाले. यामुळे वैतागलेले अनेक मतदार मतदान न करता तसेच घरी गेले. याचा फटका या तीन विधानसभा मतदारसंघातील टक्केवारी कमी होण्याच्या रूपाने बसला आहे. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४राहुल शेवाळेअनिल देसाई