मुंबईतून तीन महिन्यांत १ कोटी ३० लाख ‘उडाले’; जुलै ते सप्टेंबर महिन्यांत उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 07:18 AM2023-10-18T07:18:16+5:302023-10-18T07:18:34+5:30

गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही संख्या तब्बल ३३ टक्के अधिक आहे.

1 crore 30 lakh 'flown' from Mumbai in three months; Peak in the months of July to September | मुंबईतून तीन महिन्यांत १ कोटी ३० लाख ‘उडाले’; जुलै ते सप्टेंबर महिन्यांत उच्चांक

मुंबईतून तीन महिन्यांत १ कोटी ३० लाख ‘उडाले’; जुलै ते सप्टेंबर महिन्यांत उच्चांक

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्यमान वर्षात विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, जुलै ते सप्टेंबर या अवघ्या तीन महिन्यांत मुंबईविमानतळावरून तब्बल १ कोटी ३० लाख लोकांनी उड्डाणे केल्याची माहिती आहे. गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही संख्या तब्बल ३३ टक्के अधिक आहे. गेल्यावर्षी या तीन महिन्यांत एकूण १ कोटी लोकांनी मुंबईतून उड्डाण केले होते. 

विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय मार्गावरील प्रवाशांच्या संख्येतदेखील वाढ होत असून, प्रवाशांनी दुबई, लंडन आणि अबूधाबी या मार्गांना पसंती दिल्याचे दिसते. त्यांची संख्या १० लाख इतकी आहे. विशेष म्हणजे, आजवर भारतीय प्रवाशांच्या पसंतीचे ठिकाण असलेल्या सिंगापूरच्या ऐवजी प्रवाशांनी लंडनला पसंती दिल्याचे दिसून आले आहे. तर देशांतर्गत मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई येथे प्रवास केला आहे. त्यांची संख्या ३० लाख २४ हजार इतकी आहे.

इंडिगो, एअर इंडिया व विस्ताराला पसंती
 तीन महिन्यांत मुंबई विमानतळावरून देशांतर्गत मार्गांसाठी ६०,८६१ विमानांनी प्रस्थान-आगमन केले तर आंतरराष्ट्रीय मार्गासाठी २०,४३८ विमानांनी प्रस्थान-आगमन केले.
 ऑगस्ट या महिन्यांत मुंबई विमानतळाने सर्वाधिक प्रवासी संख्या हाताळली. त्या महिन्यात एकूण ४३ लाख प्रवाशांनी मुंबईतून प्रवास केला. 
 ऑगस्ट महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुट्या आल्यामुळे अनेकांनी विमान प्रवास केला होता. प्रवाशांनी इंडिगो, एअर इंडिया व विस्तारा या विमान कंपन्यांना पसंती दिल्याचेही दिसून आले आहे.

Web Title: 1 crore 30 lakh 'flown' from Mumbai in three months; Peak in the months of July to September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.