८६ पीडितांना ‘मनोधैर्य’ची १ कोटी ३३ लाखांची मदत; योजनेत १० लाख रुपयांपर्यंत मदतीची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 09:54 AM2023-12-19T09:54:56+5:302023-12-19T09:55:23+5:30
लैंगिक अत्याचार झालेल्या पीडितांना मनोधैर्य योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई : लैंगिक अत्याचार झालेल्या पीडितांना मनोधैर्य योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शारीरिक अत्याचारपीडित महिला, बालकांच्या पुनर्वसनासाठी सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेची बरीच मदत पीडितांना होत असून गेल्या ११ महिन्यांत ८६ पीडितांना तब्बल १ कोटी ३३ लाख ४४ हजारांची रुपयांनी आर्थिक मदत मुंबई जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
महिला, बालकांवर अत्याचार किंवा ॲसिड हल्ला झाल्यास जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रस्तावांची छाननी केली जाते. समितीकडून प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर १० लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची तरतूद या योजनेत आहे. अशा प्रकरणांत सुमारे १ कोटी ३३ लाख ७४ हजारांची मदत पीडितांना मिळाली आहे.
अत्याचाराच्या प्रकरणात मृत्यू, मानसिक धक्का बसणे, गंभीर शारीरिक इजा होऊन अवयव निकामी झाल्यास दहा लाखांपर्यंत मदत दिली जाते. अत्याचाराचे गांभीर्य लक्षात येऊन विधिसेवा प्राधिकरण प्रकरणात आवश्यक ती तातडीची मदत मिळवून देण्यासाठी पावले उचलत आहे. यातून अनेक पीडितांना आर्थिक मदत तर मिळालीच सोबतच विधी साहाय्य व पुनर्वसानाची कामे केली गेली.- अ. की. देशमुख, सचिव, मुंबई जिल्हा विधिसेवा प्राधिकरण
काय आहे मनोधैर्य योजना?
महिला व बालकांवर बळजबरी अत्याचार झाल्यास त्यांच्या पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजना शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत आर्थिक मदत देण्याची तरतूद असून ही मदत पीडिताच्या उपचार, शिक्षण, विधिसेवा, गरजेनुसार आश्रयासाठी, मनोस्वास्थ्यासाठी केली जाते.
जलदगतीमुळे दिलासा :
जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाने अध्यक्ष न्या. अनिल सुब्रमण्यम यांच्या सूचनेनुसार योजनेच्या गतिमानतेसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. यातूनच प्राधिकरणाकडे प्राप्त होणाऱ्या अर्जांचा निपटारा जलद गतीने केला जात आहे.
फक्त एक कॉल करा :
मनोधैर्य योजनेतून आवश्यक ती मदत मिळविण्यासाठी पीडित किवा त्यांच्या नातेवाइकांसाठी ८५११९०३६०१ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.