गुन्हे शाखेची कारवाई, दोन परदेशी नागरिकांसह चौघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत विक्रीसाठी आणलेले १ कोटी ४० लाख किमतीचे ७०० ग्रॅम एमडी जप्त करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी दोन परदेशी नागरिकांसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
कांदिवली पश्चिमेकडील खजुरिया नगर परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दोन परदेशी नागरिक येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ला मिळाली. त्यानुसार कक्ष ११ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. त्याच दरम्यान दोन जण रिक्षामधून आले. काही वेळाने दुचाकीवरून दोन परदेशी नागरिक तेथे धडकले. ते परदेशी नागरिक रिक्षामध्ये असलेल्या व्यक्तींना पॅकेट देत असताना आढळून येताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ७०० ग्रॅम एमडी आढळले आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य १ कोटी ४० लाख रुपये इतके आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. रात्री उशिराने कांदिवली पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करीत त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले परदेशी नागरिक हे आयव्हरी कोस्टा देशाचे नागरिक असून, नालासोपारा परिसरात राहत होते. तर अन्य दोन आरोपी हे सायन कोळीवाडा येथील रहिवासी आहेत.
अटक आरोपींपैकी एक जण अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून, वडाळा टी टी पोलीस ठाणे येथे दोन तर माटुंगा पोलीस ठाणे येथे एक असे शारीरिक दुखापत, खुनाचा प्रयत्न अशा स्वरूपाचा गुह्यांची नोंद करण्यात आली आहे.