लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल १ कोटी ४० लाख महिलांचा अर्ज; किती अर्ज ठरले वैध? आकडेवारी समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 08:09 PM2024-08-06T20:09:55+5:302024-08-06T20:11:08+5:30
योजनेतील पात्र महिलांना रक्षाबंधनादिवशी या योजनेतील दोन महिन्यांचे हप्ते मिळणार असल्याचे समजते.
CM Majhi Ladki Bahin Yojana ( Marathi News ) : राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. राज्यभरातील तब्बल १ कोटी ४० लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असून यातील जवळपास १ कोटी अर्जांची छानणी पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. या अर्जांपैकी ८३ टक्के अर्ज वैध ठरले असून पात्र महिलांना रक्षाबंधनादिवशी या योजनेतील दोन महिन्यांचे हप्ते मिळणार असल्याचे समजते.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या, मात्र अद्याप बँक खात न उघडलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे योजनेचा फायदा घेण्यासाठी सदर महिलांना लवकरात लवकर बँक खाते उघडावे लागणार आहे. आतापर्यंत जवळपास १२ अर्ज अवैध ठरवण्यात आले असून उर्वरित अर्जांची छानणी प्रक्रिया सुरू आहे.
तांत्रिक पडताळणीसाठी खात्यात जमा होणार १ रुपया
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलेच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल. जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे. तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही तटकरे यांनी केलं आहे.
“या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका," असंही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.