रेल्वे बोर्डाची १ कोटी ७० लाखांना फसवणूक
By Admin | Published: January 4, 2015 02:16 AM2015-01-04T02:16:29+5:302015-01-04T02:16:29+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे रेल्वे बोर्डाची तसेच बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे.
नवी मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे रेल्वे बोर्डाची तसेच बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. कोपरखैरणे येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत अज्ञाताने बोर्डाच्या ठेवीतील रक्कम तीन चेकद्वारे इतर बँकेत वटवून १ कोटी ७० लाखांचा अपहार केला.
रेल्वे बोर्डातर्फे कोपर खैरणेतील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत तीन कोटींची ठेवी आहे. पाच चेकद्वारे बोर्डाकडून ही रक्कम बँकेत जमा करण्यात आली होती. त्यापैकी तीन चेकचा अपहार बनावट कागदपत्राद्वारे केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारात रेल्वे बोर्डाची व बँकेची १ कोटी ७० लाखांची फसवणूक झाली आहे. रेल्वे बोर्ड अधिका-याच्या मदतीने हा गुन्हा घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बोर्डाच्या कर्मचाऱ्यांमार्फत तीन कोटींच्या ठेवीचे पाच धनादेश बँकेमध्ये जमा केले होते. त्यानंतर काही दिवसांनी एका व्यक्तीने बँकेत जाऊन त्यापैकी तीन धनादेश परत घेतले. बोर्डाची बनावट कागदपत्रे बँकेत सादर करुन हे तीन चेक काढून घेण्यात आले. त्यानंतर १ कोटी ७० लाखांचे हे तीन चेक असभ्रा कन्सल्टंसी या कंपनीच्या खात्यात वटवून रक्कम काढून घेतली. २१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१४ या दरम्यान हा प्रकार घडला. बोर्डाने ठेवीच्या रकमेसंदर्भात विचारणा केली असता बँकेत दोनच चेक जमा असल्याचे उघड झाल्याचे चौकशीत उघड झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी सांगितले. बँकेमध्ये सादर केलेल्या बनावट कागदपत्रांवर तीन चेकचे नंबर देखील दिले होते. याप्रकरणी तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)