करनिर्धारण विभागाला लागेना १ कोटीचा हिशेब, पटलावरून काढून टाकण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 08:20 AM2023-11-09T08:20:18+5:302023-11-09T08:20:29+5:30
पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागातर्फे १९७८ ते २००९ या कालावधीत विविध कार्यालयीन कामांसाठी आगाऊ खर्च करण्यात आला.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या विधी खात्यात विविध प्रशासकीय कामांसाठी उचल म्हणून घेतलेल्या लाखो रुपयांच्या आगाऊ रकमेच्या खर्चांची कागदपत्रे सापडत नसल्याने फाइल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता करनिर्धारण व संकलन विभागातही असाच प्रकार उघड झाला आहे. या विभागाच्या एक कोटी ७६ लाख रुपयांचा हिशेब लागत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेने या नोंदी लेखा विभागाच्या पटलावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागातर्फे १९७८ ते २००९ या कालावधीत विविध कार्यालयीन कामांसाठी आगाऊ खर्च करण्यात आला. या आगाऊ रकमांची कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याचे आढळून आले आहे. २००८-०९ या वर्षात मालमत्ता कर देयके पाठवण्यासाठी स्टेशनरी वस्तू पुरवठ्याचा २२ लाख रुपये इतका खर्च करण्यात आला.
विभागाचे म्हणणे...
विविध कामांसाठी खर्च केलेल्या एकूण २७८ प्रकरणांमध्ये १ कोटी ७५ लाख ९६ हजार रुपये खर्चाची ही कागदपत्रे आहेत. विभागातील एकूण ३१७ प्रलंबित आगाऊ रकमांच्या यादींपैकी रकमांचे विषय आणि नोंदी तपासून लेखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करनिर्धारण व संकलन विभागाचे कार्यालय पूर्वी भायखळा येथे होते. २०१३ मध्ये ते भायखळ्यातीलच पालिका मुद्रणालय कार्यालयाजवळ स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे या आगाऊ रकमांच्या मूळ फायली इतर विभागाच्या कागदपत्रांमध्ये मिसळण्याची शक्यता आहे, असे या विभागाचे म्हणणे आहे.