शहीद अधिकाऱ्याच्या पत्नीला १ कोटींची मदत; उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 08:57 AM2024-04-18T08:57:55+5:302024-04-18T08:59:05+5:30
२ एप्रिल २०२० रोजी दहशतवादी अड्ड्यावरून ओलीस धरलेल्या नागरिकांची सुटका करताना सूद यांचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने शहीद मेजर अनुज सूद यांच्या पत्नीला १ कोटी रुपये व दरमहा नऊ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाने १ कोटी रुपये तातडीने सूद कुटुंबीयांना देण्याचे निर्देश सरकारला बुधवारी दिले.
शहीद मेजर अनुज सूद यांच्या पत्नी आकृती सूद यांनी राज्य सरकारच्या २०१९ व २०२० च्या शासन निर्णयानुसार आर्थिक लाभ मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनिवाला यांच्या खंडपीठापुढे सुरू होती. २ एप्रिल २०२० रोजी दहशतवादी अड्ड्यावरून ओलीस धरलेल्या नागरिकांची सुटका करताना सूद यांचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले.
विशेष बाब म्हणून आर्थिक लाभ
- बुधवारच्या सुनावणीत महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले की, न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणावरून सूद कुुटुंबीयांना ‘विशेष बाब’ म्हणून आर्थिक लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- आकृती सूद यांना ६० लाख तर चंद्रकांत सूद (अनुज सूद यांचे वडील) यांना ४० लाख रुपये आर्थिक लाभ म्हणून देण्यात येणार आहेत, असे सराफ यांनी न्यायालयाला सांगितले.
- ‘याचिकाकर्त्याचे प्रकरण ‘विशेष बाब’ म्हणून विचारात घेतल्याबद्दल मुख्यमंत्री व राज्य सरकारच्या भूमिकेचे कौतुक आहे. तसेच, महाधिवक्त्यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप केल्याबद्दल आम्ही त्यांचेही कौतुक करतो,’ असे न्यायालयाने म्हटले.