मुंबई : राज्यावर कोरोनामुळे ओढावलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी सारस्वत बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासन शथीर्चे प्रयत्न करीत आहे. हेच लक्षात घेता सारस्वत बँकेच्या संचालक मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचा निर्णय घेतला.
सारस्वत बँकेने याआधी देखील संकटाच्या परिस्थितीत राज्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. २६/११ च्या हल्ल्यात पोलिसांच्या कुटुंबीयांना बँकेत नोकरी देण्यात आली होती. महाराष्ट्रात पूरग्रस्त परिस्थिती ओढावली असताना जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटींची मदत केली होती.
कोरोना या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत त्यांच्याकडे एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, ज्येष्ठ संचालक किशोर रांगणेकर, कार्यकारी संचालिका स्मिता संधाने व मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार जैन उपस्थित होते.