Join us

बँक गॅरंटीच्या नावाखाली एक कोटीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 11:47 AM

बँकेच्या कर्मचाऱ्यासह पाच जणांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बनावट बँक गॅरंटीच्या आधारे खासगी कंपनीची एक कोटी सात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका नामांकित बँकेच्या कर्मचाऱ्यासह ओडिशातील पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पाचही जण ओडिशातील आहेत. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिस अधिक तपास करत आहेत.

नरिमन पॉइंट येथील तक्रारदार व्यावसायिक मनीलाल पी. नारायणन (५१) यांच्या तक्रारीनुसार, विनायक कॉर्पोरेशन कंपनीचे संचालक आनंद वर्मा, अमरजीत राठी, प्रतिनिधी अजित साहू, ऑडिटर सुदर्शन बाल आणि त्यांना मदत करणारे आयसीआयसीआय बँकेचे कर्मचारी साबू नायरसह अन्य व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर्षी ३ जानेवारी ते ९ एप्रिलदरम्यान ही फसवणूक झाली आहे. पाचही जणांनी संगनमत करत स्वतःची खोटी ओळख निर्माण करून मनीलाल यांचा विश्वास संपादन केला. 

ठाण्यातील बँकेतील सव्वा कोटीच्या बनावट बँक गॅरंटी तयार करून मणिलाल यांच्याकडून डांबर खरेदी केले. तसेच व्यवहारासाठी बनावट ई-मेलचाही वापर केला आहे. चौकशीत बँक गॅरंटीसारखी महत्त्वाची कागदपत्रे बनावट बनविल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

 

टॅग्स :गुन्हेगारीधोकेबाजी