Join us

आरटीजीएसद्वारे १ कोटीचा निधी पाठविला, राम मंदिर देणगीबाबत शिवसेनेचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 5:39 AM

पोचपावतीसुद्धा मिळाली; राम मंदिर देणगीबाबत शिवसेनेचा खुलासा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २७ जुलै रोजीच आम्ही राम मंदिर उभारणीसाठी एक कोटीची धनराशी जमा केली आहे. पक्षाने आरटीजीएस करून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या या नावाने स्टेट बँकेच्या खात्यात जमा केली असून त्याची पोचपावतीसुद्धा मिळाल्याचे शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी रविवारी स्पष्ट केले.

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त जवळ येत असताना उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्यात मंदिरासाठी शिवसेनेकडून एक कोटीच्या निधीची घोषणा केली होती. याबाबत आज काही माध्यमांनी राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांना विचारले असता, शिवसेनेने राम मंदिरासाठी एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती. मात्र अजून यातील एक रुपयाही आला नसल्याचे विधान त्यांनी केले. त्यामुळे राम मंदिर ट्रस्टला पैसे मिळाले की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. शिवसेनेने मात्र हा दावा फेटाळून लावला.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अयोध्येतील राम मंदिरासाठी दिलेला निधी राम मंदिर ट्रस्टच्या अधिकृत खात्यात जमा झाला आहे. नृत्य गोपालदास महाराज यांचे विधान अयोग्य असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने दिलेली देणगी ट्रस्टच्या खात्यात जमा झाल्याची पोचपावती मिळाली आहे. ट्रस्टचे विश्वस्त चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी ही देणगी मिळाल्याचे कळविले असून उद्धव ठाकरे यांचे आभारही मानले होते. अध्यक्ष नृत्य गोपालदास यांनी माहिती घ्यायला हवी होती. अनिल मिश्रा यांच्याशी बोलणे झाले असून वस्तुस्थिती नृत्य गोपालदास महाराजांच्या कानी घालणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे खा. अनिल देसाई म्हणाले. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. या वेळी मंदिर उभारणीसाठी एक कोटीच्या देणगीची घोषणा त्यांनी केली होती. तसेच, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने महाराष्ट्रातून अयोध्येत येणाºया रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणीही केली होती.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराम मंदिर