भर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 04:46 AM2019-09-22T04:46:51+5:302019-09-22T04:47:00+5:30
तटरक्षक दलाची मोठी कारवाई; ११६० किलो साठा हस्तगत
मुंबई : भारतीय तटरक्षक दलाच्या राजवीर जहाजावरील अधिकाऱ्यांनी भर समुद्रात कारवाई करत बंदी असलेल्या ड्रगची मोठी तस्करी उद्ध्वस्त केली आहे. निकोबार बेटाजवळ म्यानमारच्या मालवाहू जहाजातून ११६० किलो केटामाइनची तस्करी केली जात होती. जहाजावरील ६ जणांना अटक करण्यात आली आहे. १९ सप्टेंबरला ही कारवाई करण्यात आली. या केटामाइनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल ३०० कोटी रुपये आहे.
तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर १८ सप्टेंबरला नियमित गस्तीवर असताना भारतीय हद्दीत असलेल्या मात्र तटरक्षक दलाच्या व्हीएचएफ सिग्नलना उत्तर न देणाºया जहाजाचा संशय आला. त्यांनी राजवीर जहाजामधील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर राजवीर जहाजाद्वारे या संशयास्पद जहाजाला घेरण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांनी पलायनाचा प्रयत्न केला. राजवीरमधील सैनिकांनी या जहाजाला रोखल्यानंतर या जहाजात प्रवेश केला व जहाजावर नियंत्रण मिळवले. जहाजात ५७ गोण्यांमध्ये संशयास्पद वस्तू भरून ठेवली होती. त्याची तपासणी केल्यावर ते केटामाइन असल्याचे स्पष्ट झाले. १ किलोच्या ११६९ पिशव्या या गोण्यांमध्ये भरून ठेवल्या होत्या. म्यानमारमधील डॅमसन बे येथून हे जहाज निघाल्याची माहिती जहाजामधील व्यक्तींनी दिली.
या जहाजातील केटामाइनची तस्करी थायलंड मलेशियाच्या सागरी हद्दीजवळ करण्यात येणार होती, अशी माहिती या व्यक्तींनी दिली. आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना पोर्ट ब्लेअर येथे आणण्यात आले असून त्यांची अधिक चौकशी सुरू आहे. नाकोर्टिक्स कंट्रोल बोर्ड व स्थानिक पोलिसांना तपासामध्ये सहभागी करून घेण्यात आले असून तपास सुरू आहे. या कारवाईव्यतिरिक्त गेल्या पाच वर्षांत ६ हजार कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. दलाचे जनसंपर्क अधिकारी उप महानिरीक्षक व्ही. के. विजय कुमार यांनी ही माहिती दिली.