मुंबईतील २२ आयआयटीयन्सना एक कोटीचे पॅकेज, कॅम्पस प्लेसमेंटमधून १,४०० विद्यार्थ्यांना नोकऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 13:12 IST2024-09-04T13:12:34+5:302024-09-04T13:12:47+5:30
Campus Placement: आयआयटी, मुंबईत कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून २२ विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून अधिकचे पॅकेज मिळाले. मात्र, कॅम्पस मुलाखतींतून नोकरी मिळण्याचे प्रमाण सलग तिसऱ्या वर्षी घटले आहे.

मुंबईतील २२ आयआयटीयन्सना एक कोटीचे पॅकेज, कॅम्पस प्लेसमेंटमधून १,४०० विद्यार्थ्यांना नोकऱ्या
मुंबई - आयआयटी, मुंबईत कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून २२ विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून अधिकचे पॅकेज मिळाले. मात्र, कॅम्पस मुलाखतींतून नोकरी मिळण्याचे प्रमाण सलग तिसऱ्या वर्षी घटले आहे. यंदा १४७५ विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मिळाले. गेल्या वर्षी १७८८ जणांना नोकऱ्या मिळाल्या होत्या.
कॅम्पस प्लेसमेंटसाठी नोंदणी केलेल्या २,४१४ विद्यार्थ्यांपैकी १,९८९ जणांनी मुलाखतीमध्ये सहभाग घेतला. यापैकी १,६५० विद्यार्थ्यांना मोठमोठ्या ३६४ कंपन्यांकडून नोकरीची ऑफर मिळाली. त्यातील १,४७५ विद्यार्थ्यांनी नोकरीची ऑफर स्वीकारली.
सरासरी वेतन प्रमाण ७.७ टक्क्यांनी वाढले
यंदा सर्व विद्यार्थ्यांना मिळालेल्या सरासरी पगाराचे प्रमाण तब्बल ७.७ टक्क्यांनी वधारले आहे. नुकत्याच संपलेल्या शैक्षणिक वर्षात कॅम्पसमधून नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक पॅकेज ७.७ टक्क्यांनी वधारले आहे. या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात २३.५० लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे, तर २०२२-२३ या वर्षात विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक २१.८२ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले होते, अशी माहितीही समोर आली आहे. यंदा आयआयटी मुंबईतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना परदेशी कंपन्यांनी नोकरी देऊ केली आहे. गेल्या वर्षी हीच संख्या ६५ होती.
सर्वांत कमी ४ लाख
आयआयटीमधून वार्षिक पगाराचे काही कोटी रुपयांचे पॅकेज घेऊन विद्यार्थी बाहेर पडतात. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना सर्वसाधारण पगाराच्या नोकऱ्या मिळतात.
यंदा कॅम्पसमधील नोकऱ्यांत १० विद्यार्थ्यांना चार लाख ते सहा लाख रुपयांचा पगार मिळाला आहे. यंदा प्रथमच एवढा कमी पगार मिळाला आहे.