१ कोटी आलीशान घरे रिकामी!
By Admin | Published: May 22, 2015 01:07 AM2015-05-22T01:07:23+5:302015-05-22T01:07:23+5:30
अधिक नफ्याच्या आकर्षणाने मोठ्या आकारमानाची आणि आलीशान घरे बांधण्याचा बिल्डरमंडळींचा मोह आता त्यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरताना दिसत आहे.
देशातील स्थिती : प्रकल्प पूर्ण पण ग्राहकच नाही, प्रकल्पांना फटका
मनोज गडनीस - मुंबई
अधिक नफ्याच्या आकर्षणाने मोठ्या आकारमानाची आणि आलीशान घरे बांधण्याचा बिल्डरमंडळींचा मोह आता त्यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरताना दिसत आहे. कारण, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या राज्यातील काही प्रमुख शहरासह दिल्ली, चंदिगड, बंगलोर, कोलकाता, चेन्नई अशा शहरांत मिळून सुमारे एक कोटी घर ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती रिअल इस्टेट क्षेत्रातील एका अग्रगण्य कंपनीने केलेल्या अहवालाद्वारे पुढे आली आहे.
ग्राहकांच्या मागणीच्या विपरित अशा आकारमानाच्या घरांची निर्मिती, जागतिक मंदी, बँकाचे चढे व्याजदर आणि ग्राहकाची घटलेली क्रयशक्ती याचा फटका या घरांच्या विक्रीला बसल्याची कारणमीमांसा करण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात रिकाम्या अशा या घरांची संख्या २५ लाखांच्या पुढे असून रिकाम्या घरांची सर्वाधिक संख्या ही गुरगाव, नोएडा, चंदिगडमधील असून येथील आकडा ५० लाखांच्या पुढे आहे.
घरे रिकामी राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे, या घरांचे आकारमान. २ बीएचके आणि त्यापुढील घरांचाच यामध्ये समावेश आहे. तसेच यापैकी ८५ टक्क्यांपेक्षा जास्त घरे ही मेट्रो अशा प्रथम दर्जाच्या शहरांतील आहेत. तरीही अपेक्षित ग्राहक वर्ग शोधण्यात बिल्डरांना अपयश आल्याचे दिसून आले आहे. या घरांच्या किमती किमान सव्वा कोटी रुपये ते २० कोटी रुपयांच्या दरम्यान आहेत.
घरांच्या निर्मितीचा पॅटर्न आणि ट्रेंडचीही माहिती या अहवालात असून २००८ ते २०१२ या कालावधीमध्ये निर्माण झालेल्या एकूण घरांपैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त घरे ही टू बीचके, टू अँड हाफ बीएचके, थ्री बीएच के आकारमानाची आहेत. या तुलनेत ज्या घरांची सर्वाधिक विक्री होऊ शकते अथवा जिथे अनेक ग्राहकांना आकर्षित करणे शक्य आहे, अशा वन रुम किचन आणि वन बी एचके घरांची निर्मिती मात्र फारच किरकोळ स्वरूपात झाली. या अनुभवातून शिकत बिल्डरांनी वनबीचके आणि टूबीचके घरांच्या निर्मितीकडे मोर्चा वळवला आहे. २००१ पासून निवासी संकुल या संकल्पनेने जोर धरल्यानंतर अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डर मंडळींनी क्लब हाऊस, शॉपिंग सेन्टर, हॉस्पिटल अशा अनेक सुविधा देत आलीशान फ्लॅटची निर्मिती करण्यास सुरुवात केली. २०१४ पर्यंत देशात सुमारे २१ कोटी घरांची निर्मिती झाली आहे.
महाराष्ट्रात २५ लाखांच्या पुढे
मुंबईसह महाराष्ट्रात रिकाम्या अशा या घरांची संख्या २५ लाखांच्या पुढे असून रिकाम्या घरांची सर्वाधिक संख्या ही गुरगाव, नोएडा, चंदिगडमधील असून येथील आकडा ५० लाखांच्या पुढे आहे. घरांचे आकारमान २ बीएचके त्यापुढील घरांचाच समावेश आहे.