लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून दीड वर्षात एक कोटी वाहनांनी प्रवास केला आहे. या महामार्गाने १७ जुलैला १ कोटी १४ लाख वाहनांचा टप्पा पार केला असून, त्यातून आतापर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) तिजोरीत ८२६ कोटी रुपये जमा झाले आहेत. या महामार्गाने १९ महिन्यांत वाहनांचा हा टप्पा पार केला आहे.
नागपूर ते मुंबई हा प्रवास सात तासांत पूर्ण करण्यासाठी सुमारे ५५ हजार कोटी रुपये खर्चून प्रवेश नियंत्रित असा समृद्धी महामार्ग उभारला जात आहे. या महामार्गाची लांबी ७०१ किमी असून, त्यातील नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमीचा मार्ग यापूर्वीच प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. सद्यस्थितीत या महामार्गावरून दरदिवशी साधारणपणे २० हजार वाहने धावत आहेत. यातील आतापर्यंत एका महिन्यात या महामार्गावरून उच्चांकी वाहतूक मे महिन्यात झाली आहे. मे महिन्यात ८ लाख २२ हजार १६६ वाहनांनी समृद्धीवरून प्रवास केला आहे.
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला होता. त्यावेळी नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा मार्ग सुरू केला होता. पहिल्या महिन्यात या महामार्गावरून २ लाख २० हजार वाहनांनी प्रवास केला होता. त्यातून एमएसआरडीसीच्या तिजोरीत १३ कोटी १७ लाख रुपयांचा महसूल जमा झाला होता, तर या महामार्गाने नऊ महिन्यांत म्हणजेच ऑगस्ट २०२३ मध्ये दरमहा ५ लाख वाहनांचा टप्पा पार केला होता.
दरम्यान, समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून डिसेंबर २०२३ मध्ये पहिल्यांदा या मार्गावरून वाहनांनी ७ लाखांचा टप्पा ओलांडला. आता या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावरून दरमहा ७ लाखांहून अधिक वाहने प्रवास करतात. दरम्यान, मुंबईशी जोडणी मिळाल्यानंतर वाहतुकीत वाढ होईल, असा यंत्रणांचा दावा आहे. तसेच मुंबई आणि नागपूरमधील प्रवासाचा वेळ कमी झाल्याने शेतमालाची वाहतूक वाढेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘समृद्धी’वर आतापर्यंत घडले १२३ गंभीर अपघात, २१३ जणांनी गमावला जीव
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून गंभीर अपघातांच्या १२३ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये आतापर्यंत २१३ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांमागे गाडीवरील नियंत्रण सुटणे, चालकाला झोप लागणे, टायर फुटणे, दोन वाहनांमध्ये योग्य अंतर न राखणे, भरधाव वेग आदी कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
समृद्धी महामार्ग हा राज्यातील दुसरा प्रवेश नियंत्रित मार्ग असून १५० किमी वेगाने वाहने जाऊ शकतील अशा रितीने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या महामार्गावर १२० ही वेगमर्यादा आहे. मात्र त्याहून अधिक वेगाने वाहने चालविली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यातून गंभीर अपघातही घडले आहेत. या महामार्गावर भरधाव वेगाने वाहने चालविल्याने आतापर्यंत आठ अपघात झाले असून त्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वाधिक अपघात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाले आहेत. असे ३७ अपघात घडले असून त्यात ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर वाहनांना आग लागण्याच्या दोन घटना घडल्या असून त्यात २६ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे.
समृद्धी महामार्गावरून एक कोटीहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा इगतपुरी ते आमने टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर नागपूर ते मुंबई अशी थेट जोडणी मिळणार असून, समृद्धीवरील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होईल. - अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी
वाहन वर्दळ
एप्रिल : ७,२७,६६३मे : ८,२२,१६६जून : ७,७४,०००१७ जुलैपर्यंत : ४,०९३०८
अपघाताचा प्रकार अपघात मृत्यू नियंत्रण सुटणे ३७ ५५ झोप लागणे १७ २७ टायर फुटणे १४ १६ मेकॅनिकल बिघाड १ २टेलगेटिंग २४ ४७ ओव्हरस्पीड ८ ११ अन्य २० २९ आगीच्या घटना २ २६