२५ हजारांमागे १ कर्मचारी
By admin | Published: July 19, 2014 12:42 AM2014-07-19T00:42:05+5:302014-07-19T00:42:05+5:30
मुंबईत लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ठाण्याचे अग्निशमन दल हे आजही सगळ्याच बाबतीत कुचकामी ठरत असल्याची बाब शुक्रवारच्या महासभेत उघड झाली.
ठाणे : मुंबईत लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ठाण्याचे अग्निशमन दल हे आजही सगळ्याच बाबतीत कुचकामी ठरत असल्याची बाब शुक्रवारच्या महासभेत उघड झाली. अपुरे कर्मचारी, फायर स्टेशन, अपुरी साधनसामग्री या मुद्द्यावरून महासभेत सर्वच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
विशेष म्हणजे २७० कर्मचाऱ्यांपैकी ९० कर्मचाऱ्यांनी पन्नाशी पार केली आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या तीन फायर स्टेशन्ससाठी आवश्यक असलेले ३५६ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ शासनाच्या लालफितीत अडकले असताना, पुन्हा तीन नवी फायर स्टेशन्स आणि मनुष्यबळाचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
वर्तकनगर परिसरात सुंदरबन इमारतीला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी याच अनुषंगाने शुक्रवारच्या महासभेत लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी अग्निशमन दलातील अनेक उणिवांची जाणीव प्रशासनाला करून दिली. यामध्ये अग्निशमन दलात ३४१ पदे मंजूर असली तरी प्रत्यक्षात २७० कर्मचारी आहेत. त्यातही ९० कर्मचाऱ्यांचे आयुर्मान हे ५० च्या वर आहे. याचाच अर्थ सध्याच्या लोकसंख्येच्या मानाने २५ हजार नागरिकांचा भार केवळ एका कर्मचाऱ्यावर असल्याचेही यातून उघड झाले आहे.
अग्निशमन दलाकडे साधनसामग्री असली तरी ती अपुरी असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही. दाटीवाटीने इमारती उभ्या राहत असताना त्यांना ना-हरकत दाखला अग्निशमन दल कसे देते. शिवाय हायड्रोलिक फायर शिडी हाताळण्याचे ज्ञान कर्मचाऱ्यांकडे नसल्याने सुंदरबनमध्ये आग विझवण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईची तुलना ठाण्याशी केली जात आहे. परंतु, त्या धर्तीवर ठाणे महापालिकेचे अग्शिमन दल सर्वच बाबतीत कमी ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सध्या कळवा, खारेगाव, दिवा, घोडंबदर आदी भागांत लोकसंख्या वाढत असताना या भागांत आजही फायर स्टेशन नसल्याने येथील रहिवाशांना इतर फायर स्टेशनवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले.
दरम्यान, ना-हरकत दाखला देताना कोणत्याही प्रकारची
तपासणी न करताच तो दिला जात असल्याचा आरोप नगरसेवक
विक्रांत चव्हाण यांनी केला. महापालिकेच्या प्रभाग समित्या, बीएसयूपीची घरे, वाल्मीकी आवास योजनेतील घरे यांच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच सदस्यांनी या अग्निशमन दलावर ताशेरे ओढतानाच त्यांच्याकडील कमतरता दूर करण्यासाठी कशा पद्धतीने उपाययोजना करता येतील, याचा आढावा घेतला.
यासंदर्भात अग्निशमन दलाचे प्रमुख अरविंद मांडके यांनी सांगितले की, सध्या अग्निशमन दलाच्या माध्यमातून इमारतींच्या अंतर्गत भागातील आगप्रतिबंधात्मक तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४२७ रहिवासी इमारती, २० दुकाने आणि २१ शासकीय इमारतींचा यात समावेश आहे. त्यानुसार, ६८ इमारतींचा अहवाल उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ४३ प्रकारची साधनसामग्री उपलब्ध असून यामध्ये वॉटर टेंडर, फायर फायटर, ३ उंच शिड्या आदींसह इतर वाहनांचा यात समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)