Join us

1 हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं पीककर्ज माफ; फडणवीस सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 4:44 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. नुकसानग्रस्त पूरग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी नुकसानभरपाई देऊ केली आहे. कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती, तिथलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं आहे. नुकसानग्रस्तांसाठी एक उपसमिती तयार करण्यात आली आणि त्या समितीला सर्व अधिकार देण्यात आले होते.1 हेक्टरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी काही पिकं घेतली आहेत, त्या पिकांसाठी घेतलेलं कर्ज आम्ही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन, ऊस यासाठी घेतलेल्या जास्तीत जास्त कर्जाची रक्कम माफ करण्याचं आम्ही ठरवलं आहे. ज्यांनी कर्जच घेतलं नाही आणि पिकांचं नुकसान झालं आहे, अशा शेतकऱ्यांना तीनपट भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकार करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.जवळजवळ बहुतांश शेतकऱ्यांना 1 हेक्टरपर्यंतच्या नुकसानीचा फायदा देण्याचा प्रयत्न करू, पंतप्रधान आवास योजनेतून ज्या घरांचं नुकसान झालं आहे. ती घरं बांधून देणार आहोत. तसेच पंतप्रधान आवास योजनेतून मिळणारे दोन लाख आणि त्याच्यावर 1 लाख रुपये अतिरिक्त राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणार आहेत. तसेच घर बांधण्याकरिता 5 ब्रास वाळू आणि 5 ब्रास मुरुम मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचाही उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पूरग्रस्त गावे दत्तक घेण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहे. त्या संस्था गाव दत्तक घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्या संस्थांना घरं आणि लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचं आम्ही आवाहन करत आहोत. तसेच त्यांची मदत सरकारी मदतीशी जोडून जास्तीत जास्त पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जनावरांच्या गोठ्यासाठीही अर्थसहाय्य करण्याचं ठरवलं असून, त्यासाठी 1 लाख रुपये मदतनिधी देण्यात येणार आहे. विशेषतः या पुरात व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा व्यापाऱ्यांना जीएसटीतून दिलासा देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसेच पुराच्या काळात दुसरीकडे राहणाऱ्या ग्रामीण भागासाठी 24 हजार घरभाडे देणार आहोत, तर शहरी भागासाठी 36 हजार देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीस