त्या परदेशी नागरिकाच्या पोटातून १ किलो कोकेन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:09 AM2021-08-12T04:09:09+5:302021-08-12T04:09:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडलेल्या मोझम्बिक नागरिकाकडून आतापर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडलेल्या मोझम्बिक नागरिकाकडून आतापर्यंत १.०५० किलो दक्षिण अमेरिकन कोकेन जप्त केले आहे. ७० कॅप्सूलमधून त्याने त्या पोटात लपविलेल्या होत्या. वैद्यकीय उपचार करून ते बाहेर काढण्यात आले असून त्याची किंमत तब्बल १० कोटी असल्याचे सांगण्यात आले.
फुमो इमँन्युएल झेडक्विअस असे या तस्कराचे नाव असून त्याला जे जे रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. एनसीबीच्या मुंबई पथकाला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री विमानतळावर पाळत ठेवण्यात आली होती. संशयास्पद हालचालीमुळे या परदेशी नागरिकाला ताब्यात घेतले. त्याने पोटात दुखत असल्याचे सांगितले. तो वेदनेने तळमळत असल्याने त्याला तातडीने जे जे रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीमध्ये त्याने कॅप्सूलमध्ये कोकेन भरून त्या गिळल्या असल्याचे आढळून आले. वैद्यकीय उपचार करून सर्व गोळ्या टप्याटप्याने काढण्यात आल्या.
फुमो इमँन्युएल झेडक्विअसने त्या कोठून आणि कोणासाठी मागविण्यात आला होता, त्याचे वितरण कोणाकडे करणार होता, याबद्दल चौकशी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
एका कॅप्सूलमध्ये १४.७ ग्रॅम कोकेन
तस्कर फुमो इमँन्युएल झेडक्विअसने एकूण ७० कॅप्सूल गिळल्या होत्या. एकामध्ये १४.७ ग्रॅम कोकेन होते. त्याच्या पोटातून एकूण १.०२९ किलो कोकेन काढण्यात आले आहे. एखाद्याच्या शरीरातून इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.