मुंबई : लालबाग येथील गणेश गल्लीतील चारमजली साराभाई इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर खोली क्रमांक १७ मध्ये रविवारी सकाळी ७.२३च्या सुमारास झालेल्या सिलिंडर स्फोटात सुशीला बगारे (६२) यांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. ११ जणांवर केईएम रुग्णालयात आणि चौघांवर मसिना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये ४ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असून, ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.केईएममधील प्रथमेश मुंगे, रोशन अंधारी, मंगेश राणे, महेश मुंगे, ज्ञानदेव सावंत हे ७० ते ८० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर विनायक शिंदे, ओम शिंदे, यश राणे, करिम, मिहिर चव्हाण, ममता मुंगे हे ३५ ते ५० टक्के भाजले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. मसिना रुग्णालयातील वैशाली, हिंमाशू, त्रिशा, बिपिन, सूर्यकांत हे ७० ते ९५ टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
भिंती कोसळल्या सिलिंडर स्फोटात एलपीजी सिलिंडर, इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, कपडे, घरातील साहित्य जळाले. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, खोली क्रमांक १६ आणि १७च्या भिंतींसह या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. दाेन्ही घरांच्या भिंती कोसळल्या. खबरदारी म्हणून येथील वीजप्रवाह सर्वप्रथम खंडित करण्यात आला.