लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई उपनगरात चरस या अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या सराईताला शनिवारी क्राईम ब्रँचच्या कक्ष १२ ने मालाडमधून अटक केली. त्याच्याकडून जवळपास १ कोटी २ लाख ४० हजार रुपयांचे चरस हस्तगत करण्यात आले.
किसन गौड ऊर्फ साठे (२४) असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे. क्राईम ब ब्रँचच्या कक्ष १२ ने ११ फेब्रुवारी, २०२१ रोजी त्याचा साथीदार सूरज यादव (२१) याला अटक केली होती. याची माहिती गौड याला मिळताच तो घटनास्थळाहून पसार झाला हाेता. मात्र कक्ष १२ चे प्रमुख महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास भोसले, सचिन गवस, कॉन्स्टेबल कल्पेश सावंत यांनी तपासाअंती त्याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत १ कोटी २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ३ किलो २०० ग्रॅम चरस पोलिसांना सापडले. गौड याला न्यायालयाने १६ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे तावडे यांनी सांगितले.
............................