Join us

यंदा आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:06 AM

नवाब मलिक यांची माहिती : राज्यभरात प्रवेश प्रक्रिया सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ ...

नवाब मलिक यांची माहिती : राज्यभरात प्रवेश प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) गुरुवारपासून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. यंदा शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार, तर खासगी आयटीआयमध्ये ४४ हजार अशा एकूण १ लाख ३६ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्याहस्ते या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात गुरुवारी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रधान सचिव मनीषा वर्मा, आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक योगेश पाटील यांच्यासह ऑनलाईन पद्धतीने राज्यातील आयटीआयचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते.

प्रवेश प्रक्रिया सुरू होताच अवघ्या काही वेळातच १५ इच्छुक उमेदवारांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले. संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. एकूण ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असून ८० अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण, तर ११ अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण वा अणुत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुद्धा कौशल्य प्रशिक्षण मिळून त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठी त्यांना ११ अभ्यासक्रमांमध्ये संधी देण्यात येत आहे. दहावीचे निकाल घोषित झाल्यानंतर सविस्तर प्रवेश वेळापत्रक संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात येईल. तोपर्यंत प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेणे तसेच प्रवेश अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिल्याचे मंत्री मलिक यांनी सांगितले.