मुंबई : स्वित्झर्लंड येथील दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार आहेत. जवळपास २० उद्योगांसमवेत सुमारे १ लाख ४० हजार कोटींचे करार होणार असून आजपर्यंत दाओसमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच महाराष्ट्राचे सामंजस्य करार होत आहेत. १६ आणि १७ जानेवारी असे दोन दिवस मुख्यमंत्री या परिषदेत उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांसमवेत शिष्टमंडळात उद्योगमंत्री उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारी असतील. ही परिषद २० जानेवारीपर्यंत चालणार आहे.
मुख्यमंत्री १५ तारखेस मुंबईहून झुरिचसाठी रवाना होतील. १६ जानेवारी रोजी दुपारी महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. १७ जानेवारी रोजी लक्झमबर्गचे पंतप्रधान, जॉर्डनचे पंतप्रधान, सिंगापूरचे माहिती व दूरसंचार मंत्री, जपान बँक, सौदी अरबचे उद्योग व खनिकर्म मंत्री, स्विस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी होतील. मंगळवारी दुपारी शिंदे यांचे कॉँग्रेस सेंटर येथे संबोधन होणार आहे.