Join us

मुंबई विमानतळावर १ लाख ६० हजार प्रवासी संख्येचा उच्चांक; शनिवार, ठरला सर्वात व्यस्त दिवस 

By मनोज गडनीस | Published: November 20, 2023 5:53 PM

मुंबई विमानतळावरून देशातील अनेक विमानतळांशी थेट जोडणी वाढली आहे.

मुंबई - गेल्या शनिवारी मुंबईविमानतळाने प्रवासी संख्येचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून त्यादिवशी २४ तासांत विमानतळावरून तब्बल १ लाख ६१ हजार ७६० प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. मुंबई विमानतळावरून देशातील अनेक विमानतळांशी थेट जोडणी वाढली आहे. त्यातच हिवाळी हंगामाकरिता नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) देशातील विमान कंपन्यांना प्रत्येक आठवड्यासाठी वाढीव विमान फेऱ्यांची अनुमती दिली आहे. त्यानंतर विमान कंपन्यांनी अनेक मार्गांवरील फेऱ्या वाढवल्या आहेत. परिणामी, लोकांनी विमान प्रवासाला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, देशातील दुसऱ्या क्रमांकांचे व्यस्त विमानतळ म्हणून ओळख असलेल्या मुंबई विमानतळाने एकिकडे प्रवासी संख्येचा उच्चांक प्रस्थापित केलेला असतानाच दुसरीकडे ११ नोव्हेंबर रोजी विक्रमी विमान फेऱ्यांचा देखील नवा विक्रम प्रस्थापित केला होता. ११ नोव्हेंबर रोजी एका दिवसात १०३२ विमानांच्या फेऱ्या झाल्या. तर ११ ते १३ नोव्हेंबर अशा दिवाळीच्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावरून तब्बल ५ लाख १६ हजार ५६२ लोकांनी प्रवास केला.

टॅग्स :मुंबईविमानतळगौतम अदानी