‘अॅम्फोटेरिसिन बी’च्या १ लाख कुप्या मुंबई विमानतळावर दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:00+5:302021-06-06T04:06:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे या आजारावर गुणकारी मानल्या जाणाऱ्या ‘अॅम्फोटेरिसिन बी’ची आयात वाढविण्यात आली आहे. शनिवारी या औषधांच्या १ लाख कुप्या मुंबई विमानतळावर दाखल झाल्या.
एका म्युकरमायकोसिसबाधित रुग्णावर उपचारासाठी जवळपास १०० कुप्या लागत असल्याने देशभरात ‘अॅम्फोटेरिसिन बी’चा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे याची मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येत आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील ‘अॅम्फोटेरिसिन बी’चा साठा शनिवारी मुंबई विमानतळावर दाखल झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. अमेरिकेतील गिलिएड सायन्स या औषध उत्पादक कंपनीकडून आयात करण्यात आलेली ही वैद्यकीय सामग्री शनिवारी मुंबईत पोहोचली. त्यात ‘अॅम्फोटेरिसिन बी’च्या १ लाख कुप्या हाेत्या.
........................