१ लाख कोटी रुपयांच्या घरांची विक्री ३ महिन्यांत; मुंबईत ४१ हजार घरांची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 09:59 AM2024-04-12T09:59:21+5:302024-04-12T09:59:58+5:30
देशात उच्चांक, मुंबईत ४१ हजार घरांची खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या वर्षीप्रमाणेच नववर्षातही देशात गृहखरेदीचा जोर कायम असून नववर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातील प्रमुख शहरांत मिळून एकूण १ लाख २० हजार घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, या गृहविक्रीच्या माध्यमातून तब्बल १ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. हा आजवरचा उच्चांक असून गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गृहविक्रीमध्ये ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात एकूण ८५ हजार ८४० घरांची विक्री झाली होती.
बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचा आढावा घेणाऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशात सरत्या तीन महिन्यांत झालेल्या घरांच्या विक्रीमध्ये सर्वाधिक विक्री मुंबई, पुणे, दिल्ली, एनसीआर व हैदराबाद येथे झाली आहे. यापैकी मुंबईतील घरांची विक्री सर्वाधिक असून सरत्या तीन महिन्यांत मुंबईत ४१ हजार ५९० घरांची विक्री झाली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहर असून पुण्यात एकूण २३ हजार ११० घरांची विक्री झाली आहे. घरांच्या एकूण विक्रीपैकी ७६ टक्के विक्री नमूद केलेल्या पाच ठिकाणी झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, दिल्ली व हैदराबाद येथे सरत्या वर्षभरात घरांच्या किमतीमध्ये १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, तरी देखील या वाढीव किमतीचा गृहविक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही.
शहर गृहविक्री
मुंबई ४१,५९०
पुणे २३,११०
दिल्ली-एनसीआर १०,०६०
अहमदाबाद १२,९२०
बंगळुरू १०,३८०
चेन्नई ४,४३०
हैदराबाद १४,२९०
कोलकाता ३,८६०