Join us  

‘मित्रा पार्क’मुळे १ लाख रोजगार; अमरावतीत १० हजार कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 7:35 AM

अमरावतीत १० हजार कोटींची गुंतवणूक, २ लाख अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचा आरंभ करण्यात आला असून, यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पीएम मित्रा पार्कमुळे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तर १ लाख थेट आणि २ लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.    

ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे रविवारी आयोजित कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थित यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राची प्रगती वेगाने होत आहे. गुंतवणूक आकर्षित करणारी इकोसिस्टम अस्तित्वात आहे. अमरावती परिसरात  कापूस पिकवला जातो. येथून जास्तीत जास्त १० टक्के निर्यात येथे होत असून, उद्योगाच्या भरभराटीवर भर दिल्याबद्दल राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. 

एकूण १३२० कोटींच्या चार सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यात सनाथन पॉलीकॉट १००० कोटी, प्रताप इंडस्ट्रीज २०० कोटी, श्री सिद्धिविनायक कॉटस्पीन १०० कोटी आणि पोलमन इंडिया यांच्या २० कोटींच्या करारांचा समावेश आहे. त्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ५००० इतका रोजगार उपलब्ध होणार आहे.

दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार

आजचा दिवस विशेष दिवस आहे. कारण अमरावतीत पीएम मित्रा पार्क सुरू होत आहे. आम्ही इगो बाजूला ठेवून काम करत आहोत. कारण आम्ही जनतेचे भले करत आहोत. सरकार बदलले आणि वातावरण बदलले. आमचे सरकार आले आणि विकास सुरू झाला. पायाभूत सेवा-सुविधांचा विकास सुरू झाला. केंद्राने आम्हाला मदत केली. सरकार बदलले नसते तर राज्य आणि दहा वर्षे मागे गेले असते. कारण गुंतवणूकदार गुंतवणूक करत नव्हते. आता विकास होत आहे. आम्ही दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत. ज्यांना टीका करायची आहे त्यांना करू द्या. आम्ही काम करत राहणार. राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद गठित करण्यात आली आहे.    - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

कराराचा आनंदपीएम मित्रा पार्क योजनेला मंजुरी मिळाली आणि आज त्याचा सामंजस्य करारही झाला याचा आनंद आहे. पहिला टेक्सटाइल पार्क अमरावती येथे होत आहे, याचा विशेष आनंद आहे. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणानुसार ज्या भागात कापूस उत्पादित होतो, त्या भागात कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण झाले पाहिजेत यावर काम केले. कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये टेक्सटाइल पार्क निर्माण करण्याचा निर्णयानुसार अमरावती येथे टेक्सटाइल पार्क उभे राहत आहे.  - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :वस्त्रोद्योगअमरावतीमुंबईदेवेंद्र फडणवीस