देशभरात ४ टक्के, तर महाराष्ट्रात ३० टक्के अधिक पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 06:45 AM2019-09-15T06:45:48+5:302019-09-15T06:45:56+5:30
सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून परतीच्या प्रवासाला निघेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली
मुंबई : सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून परतीच्या प्रवासाला निघेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, १ जून ते १४ सप्टेंबर या काळात देशात सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक पाऊस नोंदविला आहे. साधारणपणे देशात ८०१.३ मिमी पाऊस होतो. यंदा मात्र, ८३५.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात १,१९१.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस ३० टक्के अधिक आहे. साधारणत: राज्यात ९१६.५ मिमी पावसाची नोंद होते. राजस्थान, गुजरात, दादर व नगर हवेली, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार येथेही यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्या खालोखाल जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, सिक्किम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात उणे
सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाची उणे नोंद झाली आहे. सर्वात कमी पाऊस सोलापूर जिल्ह्यात झाला असून, ही नोंद उणे ५४ टक्के आहे.
>१ जून ते १४ सप्टेंबर
दरम्यानचा पाऊस (मिमी)
राजस्थान ५३६.३, गुजरात ८६२.६, मध्य प्रदेश ११६७, दादर आणि नगर हवेली ३३८९.१, महाराष्ट्र ११९१.५, गोवा ३७९८.३, कर्नाटक ९१२.१, लक्षद्वीप ११४६.५, अंदमान आणि निकोबार १९५०.२
>या राज्यांत पडला कमी पाऊस
हरयाणा,
उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांत कमी पाऊस नोंदविण्यात आला.
मणिपूरमध्ये
सर्वांत कमी पाऊस झाला.