Join us

राज्यात म्युकरमायकोसिसचे १ हजार ७६८ रुग्ण उपचाराधीन; १ हजार ३७९ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 7:32 AM

राज्यात आतापर्यंत एकूण १० हजार २० रुग्णांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला आहे.

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता राज्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्याही खालावली आहे. मात्र राज्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या संसर्गाने १ हजार ३७९ रुग्णांचा बळी गेला आहे, तर आतापर्यंत राज्यात १ हजार ७६८ रुग्ण उपचाराधीन आहेत, तर सर्वाधिक मृत्यूची नोंद मुंबईत झाली आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण १० हजार २० रुग्णांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला आहे. यापैकी ६ हजार ७४६ रुग्ण बरे झाले आहेत, तर १ हजार ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील रुग्ण म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी मुंबईत येत असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत आतापर्यंत म्युकरमायकोसिससचे एकूण ९१८ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ५५१ रुग्ण बरे झाले आहेत, तर १७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या १८९ सक्रिय रुग्ण आहेत.

बुरशीचा संसर्ग कमी; पण धोका कायम

मे महिन्यात म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण राज्यात आढळला होता. राज्यात नागपूरमध्ये सर्वाधिक म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये एकूण १ हजार ५३६ रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात १ हजार ३५१, औरंगाबादमध्ये १ हजार ११८, मुंबईमध्ये ९१८ आणि नाशिकमध्ये ७६० रुग्ण नोंद करण्यात आले आहेत. नागपूरमध्ये सध्या ४७०, पुण्यात ३०६, औऱंगाबाद येथे ३०६, मुंबईत १८९ आणि ठाण्यात ९१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याविषयी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले, कोरोनाच्या दैनंदिन रुग्णात घट झाल्यानंतर काळ्या बुरशीच्या संसर्ग झालेल्या रुग्णांचेही प्रमाण कमी झालेले दिसून आले. मात्र या संसर्गाचा धोका टळलेला नाही. अतिजोखमीचे आजार असणाऱ्या रुग्णांनी काळजी घ्यावी, कोरोनामुक्त झाल्यानंतर आवश्यक खबरदारी घेऊन नियमितपणे वैद्यकीय तपासणी व औषधोपचार करावेत.

टॅग्स :महाराष्ट्र