मुंबई : २०१६ ते २०१८ सालापर्यंतच्या तीन वर्षांमध्ये म्हाडाने काढलेल्या सोडतीत विजेते ठरूनही तब्बल १ हजार ८८२ विजेत्या अर्जदारांना अद्याप घराचा ताबा मिळालेला नाही. या घरांना ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) मिळाली नसल्याने घरांचा ताबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे म्हाडाच्या सोडतीमध्ये विजेते ठरूनही या विजेत्यांचे हक्काच्या घरात राहण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलेच आहे.
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा परवडणाऱ्या घरांची लॉटरी काढते. २०१६ ते २०१८ पर्यंतच्या कालावधीत म्हाडाने मुंबईतील घरांच्या सोडती काढल्या, मात्र यातील १ हजार ८८२ घरांना ओसी न मिळाल्याने विजेत्यांना अद्याप ताबा देण्यात आलेला नाही. दरम्यान, या विजेत्यांना लवकरच ही घरे उपलब्ध केली जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. ते अजूनही प्रत्यक्षात आले नसल्याचा अर्जदारांचा आक्षेप आहे.
म्हाडा वसाहतींसाठीही नियोजन प्राधिकरणाचे अधिकार हे आतापर्यंत मुंबई महापालिकेकडेच होते. गेल्या वर्षी राज्य सरकारमार्फत म्हाडाच्या ५६ वसाहतींसाठी पालिकेकडे असलेले नियोजन प्राधिकरणाचे अधिकार म्हाडाकडे हस्तांतरित करण्यात आले. यामुळे आता म्हाडाकडून त्या घरांच्या ओसीबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी कुर्ल्यातील सुमारे २५० आणि गोरेगावमधील सुमारे १०० घरांच्या ओसींविषयी निर्णय प्रक्रिया लवकरच अपेक्षित असल्याचे सांगण्यात येते.