मुंबई :
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) तिजोरीत एक हजार कोटी रुपयांच्या निधीची भर पडली आहे. मुंबई पालिकेने मेट्रो प्रकल्पांतील आर्थिक सहभागाची रक्कम एमएमआरडीएला दिली आहे. एमएमआरडीएकडून आता संबंधित पालिका क्षेत्रातील मेट्रो प्रकल्पांवर झालेल्या खर्चापोटी आर्थिक सहभागाची रक्कम अन्य पालिकांकडेही मागितली जाणार आहे. त्यातून एमएमआरडीएवरील आर्थिक ताण काहीसा हलका होण्यास मदत मिळणार आहे.
एमएमआरडीएकडून मुंबई महानगरात ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारले जात आहे. सध्या आठ मेट्रो मार्गिकांच्या उभारणीचे कामे सुरू आहे. एमएमआरडीएने मुंबई शहरात मेट्रो प्रकल्पांची आतापर्यंत २० हजार कोटी रुपयांची कामे केली आहेत, तर एमएमआरडीएला मेट्रो मार्गिकांची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे.
ठाणे, केडीएमसीचा निधी कधी मिळणार?मेट्रो मार्गिकेची उभारणी करणाऱ्या प्राधिकरणाने ५ टक्के निधी, तर केंद्राने १० टक्के, राज्याने १० टक्के आणि ज्या पालिकेच्या हद्दीत मेट्रो उभारली जात त्यांनी २५ टक्के आर्थिक सहयोग द्यावा, असे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे, केडीएमसीने निधी देणे अपेक्षित आहे.मागितले ५००० कोटी, मिळाले १००० कोटी मुंबईत मेट्रो मार्गिका उभारण्यासाठी आतापर्यंत झालेल्या २० हजार कोटींच्या खर्चातील पालिकेच्या सहभागापोटी पाच हजार कोटींची मागणी एमएमआरडीएने केली होती. त्यानुसार पालिकेने पहिल्या टप्प्यात एक हजार कोटींचा निधी दिला आहे. पुढील टप्प्यात अन्य पालिकांकडूनही त्यांच्या सहभागाच्या निधीची मागणी एमएमआरडीएकडून केली जाणार आहे.
राज्य सरकारकडून ३,५०० कोटी येणे बाकीमुंबई महानगरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या खर्चापोटी निधी जमा करण्यासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त १ टक्के मुद्रांक शुल्कासह अन्य कर लावण्यात आले आहेत. सरकारकडून २०१६ पासून या करांपोटी जमा केलेली रक्कम एमएमआरडीएला मिळणे अद्याप बाकी आहे. आतापर्यंत ही रक्कम ३,५०० कोटींवर पोहोचली आहे.