दादर रेल्वे स्थानकात १ ते १४ सलग फलाट; प्रवाशांना मिळणार दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 07:18 AM2023-09-28T07:18:34+5:302023-09-28T07:18:58+5:30
९ डिसेंबरपासून बदल होणार, प्रवाशांना मिळणार दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकावरून प्रवाशांचा नेहमीच गोंधळ उडतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एका ओळीत (सलग) फलाट क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांक ‘जैसे थे’ राहणार असून मध्य रेल्वेमार्गावरील पहिल्या फलाटाला आता आठ क्रमांक देण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील प्लॅटफॉर्म आता ८ ते १४ होतील. याची अंमलबजावणी येत्या ९ डिसेंबरपासून होणार आहे.
दादर हे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मध्यवर्ती आणि नेहमीच गर्दी असणारे स्थानक असून अनेकदा नेमक्या कोणत्या प्लॅटफॉर्म जायचे याचा अंदाज न आल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दादर स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्मला एका रांगेत क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधात दोन्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनुसार आता प. रेल्वे ते मध्य रेल्वे अशा पद्धतीने फलाटाला रांगेमध्ये क्रमांक दिले जाणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्लॅटफॉर्मचे क्रमांक बदलणार नाहीत. मात्र, मध्य रेल्वेवरील प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्यात येणार आहेत.
असे असतील फलाट क्रमांक
पश्चिम रेल्वे : १ ते ७ प्लॅटफॉर्म
मध्य रेल्वे : ८ ते १४ प्लॅटफॉर्म
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील धिम्या मार्गावरील पहिल्या प्लॅटफॉर्मला आता आठवा क्रमांक असेल. त्यानंतर टर्मिनसचा प्लॅटफॉर्म क्रमांक १४ असा असेल. हे सर्व बदल केंद्रीय रेल्वे सूचना प्रणालीमधील उद्घोषणा यंत्रणेतही होतील, तसेच पादचारी पूल व दिशादर्शक फलकांवरही ते सुधारून नव्याने दिले जातील.
फलाट क्रमांक २ इतिहास जमा
दादर स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरून दादर लोकल सोडण्यात येत होती; परंतु फलाट क्रमांक १ च्या रुंदीकरणासाठी हा फलाट कायमचा बंद करण्यात आला आहे. आता नवीन क्रमांकानुसार फलाट १ हा ८ म्हणून ओळखला जाईल, तर फलाट २ बंद असल्याने आता क्रमांक दोनऐवजी फलाट क्रमांक ३ हा ९ म्हणून ओळखला जाईल.