Join us  

Vidhan Parishad Election: १ वरळी अन् ४ आमदार! वरळीकरांना लागली लॉटरी; विधान परिषदेवर आणखी एकाला संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 4:20 PM

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सर्वांचे लक्ष वरळी मतदारसंघावर लागून राहिलं होतं. त्याचं कारणही खास होते.

मुंबई - राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीचं वारं जोरदार वाहत असताना दुसरीकडे विधान परिषदेच्या १० जागांसाठी उमेदवारांची घोषणा झाली आहे. येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेने सचिन आहिर, आमशा पाडवी यांना संधी दिली आहे. त्यामुळे दिवाकर रावते, सुभाष देसाई यांना घरी बसावं लागणार आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सर्वांचे लक्ष वरळी मतदारसंघावर लागून राहिलं होतं. त्याचं कारणही खास होते. आतापर्यंत निवडणुकीच्या मैदानात न उतरलेल्या ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) पहिल्यांदाच निवडणूक लढवणार होते. त्यामुळे आदित्यला निवडून आणण्यासाठी सुरक्षित मतदारसंघ असणं गरजेचे होते. शिवसेनेने वरळी मतदारसंघातून तत्तकालीन आमदार सुनिल शिंदे यांना वेट अँन्ड वॉचची भूमिका घ्यायली लावली आणि आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभं केले. 

वरळी मतदारसंघात प्राबल्य आणि तगडा उमेदवार असलेल्या सचिन आहिर यांनाही शिवसेनेने त्यांच्या पारड्यात घेतले. सचिन आहिर(Sachin Ahir) यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे वरळीतून आदित्य ठाकरे यांची लढाई सोपी झाली. मात्र आदित्यच्या उमेदवारीसाठी ज्यांनी त्याग केला त्या सुनिल शिंदे आणि सचिन आहिर यांना शिवसेनेने आमदारकीची भेट दिली आहे. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे आमदार झाले. शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार म्हणून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे याठिकाणचे भाजपा नेते सुनिल राणे यांना पक्षाने बोरिवली येथे विधानसभेचं तिकीट दिले. 

बोरिवली मतदारसंघातून सुनिल राणे विजयी झाले, दुसरीकडे वरळीतून आदित्य ठाकरे निवडून आले. त्यानंतर मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने सुनिल शिंदे यांना उमेदवारी देत विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आणले. त्यानंतर आता जुलैमध्ये मुदत संपलेल्या दिवाकर रावते, सुभाष देसाई यांच्या जागेवर सेनेने सचिन आहिर, आमशा पाडवी यांना संधी दिली. त्यामुळे वरळीकरांना विधान परिषदेची आणखी एक लॉटरी लागली आहे. १ वरळी आणि ४ आमदार असं बहुदा पहिल्यांदा वरळीकरांना अनुभवायला मिळत असेल. 

टॅग्स :शिवसेनाआदित्य ठाकरेविधान परिषद निवडणूकसचिन अहिर