मुंबई - देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण अतिशय गढूळ झालं आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात आजाराशी, मृत्यूशी आणि महामारीशी लढणारी माणसं आज एकमेकांशी लढताना दिसत आहेत. राजकीय द्वेषातून कारवाया आणि कटकारस्थान रचले जात आहेत. प्रशासनाचाही वापर राजकीय हेतुनेच केला जात आहे. त्यातच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर काही प्रमाणा मंदिर आणि मशिदींचा मुद्दा समोर आला आहे. त्यावरुनच आपल्या विदर्भीय स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या नितेश करळे गुरुजींनींनी अतिशय मार्मिक शब्दात सर्वांनाच चिमटा काढला आहे.
कोरोना लॉकडाऊन संपले असून माणसं आता कामा-धंद्याला लागली आहेत. उद्योग-व्यवसायात गुंतली आहेत. मात्र, राजकीय नेत्यांच्या चर्चांमधून येत असलेल्या धार्मिक, जातीय गोष्टींना लोकं त्रासली आहेत. लोकांनाही असा वाद, किंवा तशी चर्चा नको आहे. मात्र, दररोज माध्यमांना बाईट देऊन राजकीय पोळी भाजप, स्वत:चा टिआरपी वाढविण्यासाठी विध्वंसक बाता केल्या जात आहेत. राज्यात मंदिर आणि मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. तर, हनुमान जयंतीदिनी निघालेल्या मिरवणुकींत दगडफेकीची घटना घडल्याने दिल्लीत हिंसाचार बोकाळला आहे. त्यातून, गरिबांच्या घरावर, दुकानांवर बुलडोझर फिरले आहेत. यावरुन सोशल मीडियावर संताप पाहायला मिळत आहे.
आपल्या शिकविण्याच्या विदर्भीय स्टाईलने परिचीत असलेल्या नितेश करळे मास्तरांनी बुधवारी एक सूचक विधान ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटला नेटीझन्सचीही पसंती मिळत आहे. ''आजच्याच दिवशी बरोबर एक वर्षापूर्वी,आम्ही स्वतःला वाचवण्यासाठी ऑक्सिजन, बेड हॉस्पिटलच्या औषधांसाठी लढत होतो. आज बरोबर एक वर्षानंतर आपण मंदिर मशीद, लाऊडस्पीकर, अजान, हनुमान चालीसा, बुरखा आणि धर्माच्या नावावर लढत आहोत.'', असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
दरम्यान, सध्या देशात महागाई प्रचंड वाढली असून पेट्रोल-डिझेलचे दर कमालीच वाढले आहेत. त्यामुळे, इतर भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही वाढ झाली. वाढत्या महागाईकडे, बेरोजगारीकडे, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या प्रश्नांकडे कोणाही पाहात नाही. मात्र, अशा धार्मिक घटनांवर तातडीने प्रतिक्रिया देत आहेत. सर्वसामान्य माणसांनाही हे पटत नाही. त्यामुळेच, सोशल मीडियातून ते व्यक्त होतात. मात्र, बदल कुठेच दिसून येत नाही.