मुंबई - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या ४८ तासांत एकूण ११ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण १० कोटी ३० लाख रुपये मूल्याचे सोने जप्त केले आहे. एकूण १८ किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, यापैकी एका प्रकरणात शारजामधून आलेल्या मोईनुद्दीन शकील झोरादवाला या व्यक्तीकडे सोने असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. त्यांनी त्यासंदर्भात त्याला विचारणा केली असता त्याने सोने नसल्याचे सांगितले. मात्र, त्याने परिधान केलेल्या जीन्सच्या आतील बाजूला सोने लपविल्याचे आढळून आले. त्याच्याकडे एकूण साडे सहा किलो सोने आढळून आले. त्याची किंमत ३ कोटी ८३ लाख रुपये इतकी आहे. तर अन्य प्रकरणात शारजा येथून मुंबईत येत आणि मुंबईतून काठमांडू येथे जाणाऱ्या दोन भारतीय प्रवाशांकडून देखील मोठ्या प्रमाणावर सोन्याची पावडर हस्तगत करण्यात आली आहे.