नवी दिल्ली : देशातील तीन प्रमुख शहरांमधून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाठी 10 हजार कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यामाध्यमातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खास सुविधा मिळू शकणार आहेत. बैठकीनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती देताना सांगितले, केंद्र सरकारने नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिंनस (मुंबई) आणि अहमादाबाद या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाठी 10,000 कोटी मंजूर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. माहितीनुसार, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटले, रेल्वे स्थानक हे शहराच्या दोन्ही भागांना जोडणारा दुवा बनला पाहिजे. दीर्घ कालावधीसाठी प्लॅन असला पाहिजे. ज्यामध्ये प्रवाशांना थांबण्यासाठी पुरेशी जागा, फूड प्लाझा इत्यादींची सोय असावी. या सर्वांसाठी सुरुवातीला तीन प्रमुख शहरांची स्थानके निवडण्यात आली आहेत.
फडणवीसांनी समजावला मोदी सरकारचा 'प्लॅन'या निर्णयाची घोषणा होताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ ट्विट करून संपूर्ण प्लॅन सांगितला आहे. "प्रिय मुंबईकरांनो, भविष्यात आपले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी रेल्वे स्थानक असेच असेल! धन्यवाद @narendramodi जी", अशा शब्दांत फडणवीसांनी एक व्हिडीओ ट्विट करून सीएसएमटी स्थानकाचा कायापालट कशा स्वरूपात होणार हे सांगितले आहे.
मोदींचा आणखी एक मोठा निर्णयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आता रेशन कार्डधारकांना डिसेंबरपर्यंत मोफत रेशनचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने एप्रिल 2020 मध्ये कोविड काळात ही योजना सुरू केली होती. सरकारच्या या घोषणेनंतर थेट 80 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. यापूर्वी केंद्रीय अन्न विभागाच्या सचिवांनीही ही योजना आणखी पुढे वाढविण्यासंदर्भात संकेत दिले होते. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही जगातील सर्वात मोठी अन्न योजना आहे.