भिंतीत घबाड; १० कोटींच्या नोटा अन् १९ किलो चांदीच्या विटा! जीएसटी विभागाची झवेरी बाजारात ‘रेड’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 07:57 AM2022-04-23T07:57:52+5:302022-04-23T08:12:40+5:30
जीएसटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, झवेरी बाजारातील चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल २०१९ -२० मध्ये २२.८३ कोटीवरून २०२०-२१ मध्ये ६६५ कोटी आणि २०२२ मध्ये तर १७६४ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याने जीएसटी विभागाला संशय आला.
मुंबई : अभिनेता अजय देवगण याच्या ‘रेड’ चित्रपटातील दृश्याप्रमाणे रंगलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान झवेरी बाजारातील सराफाच्या कार्यालयात भिंतीत दडवून ठेवलेले कोट्यवधींचे काळे धन जीएसटी विभागाच्या हाती लागले आहे. जीएसटी विभागाने झवेरी बाजारातील चामुंडा बुलीयन या कंपनीवर केलेल्या कारवाईत कंपनीतील भिंतीतून तब्ब्ल १० कोटींची रोकड आणि १९ किलो चांदीच्या विटा जप्त केल्या आहेत. प्राप्तिकर विभागानेही याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.
जीएसटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, झवेरी बाजारातील चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल २०१९ -२० मध्ये २२.८३ कोटीवरून २०२०-२१ मध्ये ६६५ कोटी आणि २०२२ मध्ये तर १७६४ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याने जीएसटी विभागाला संशय आला. गेल्या तीन वर्षांतील या प्रचंड उलाढालीमुळे जीएसटी विभागाने अधिक चौकशी सुरू केली असता या कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणीच नसल्याचे आढळले. त्यानुसार, जीएसटी विभागाने कंपनीच्या कार्यालयांची झाडाझडती सुरू केली असता सुरुवातीला काही हाती लागले नाही. अखेर, कंपनीच्या एका ३५ चौरस मीटरच्या लहानशा जागेत भिंतीत लपवून ठेवलेली ९ कोटी ७८ लाखांची रोकड आणि १३ लाख रुपये किमतीच्या चांदीच्या विटा हाती लागल्या.
राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी चोरीविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली असून हजारो कोटींची जीएसटी चोरी शोधण्यात यश मिळविले आहे. राज्य करविभागाचे सहआयुक्त राहुल द्विवेदी, उपायुक्त विनोद देसाई यांच्या नेतृत्वात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
प्राप्तिकर विभागालाही दिली माहिती -
ही जागा सीलबंद करण्यात आली असून प्राप्तिकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, प्राप्तिकर विभागाने ही रक्कम दागिने नेमके कुठून व कसे आले? याशिवाय आणखी कुठे कुठे किती ऐवज दडवून ठेवला आहे? याबाबत अधिक तपास सुरू केला.