मुंबई - जोगेश्वरी येथील गृह प्रकल्पातील नफ्याच्या १० कोटींहून अधिकच्या रक्कमेवर डल्ला मारल्याच्या आरोप करत, अन्य एका कंपनीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी मे. ऐश्वर्या अवंत बिल्डर्स एलएलपी कंपनीचे पार्टनर सुदीप कुमार साह विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
तक्रारदार हेमलता शाह (५९) यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, २०१९ ते आतापर्यंत मे. ऐश्वर्या अवंत बिल्डर्स एलएलपी कंपनी व कंपनीचे पार्टनर गैरअर्जदार सुदीप कुमार साह यांनी जोगेश्वरी येथील गृह प्रकल्पाच्या फेज १ व २ मध्ये झालेल्या नफ्यातील १० कोटींपेक्षा जास्त रक्कम स्वत: लाटून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. प्रकल्पातील कागदपत्रे तसेच अन्य पुराव्यांच्या मदतीने पोलिस तपास करत आहेत.
नेमके प्रकरण काय?
हेमलता यांचे पती हर्ष यांचे ऑगस्ट २०१९ मध्ये निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी बांधकाम व्यवसायातील विविध कंपन्यांसोबतच अन्य व्यवसायांमध्येही गुंतवणूक केली होती. ते या कंपन्यांमध्ये भागीदार होते. हर्ष यांनी त्यांच्या मृत्युपत्रात सर्व स्थावर, जंगम मालमत्तेसह कंपन्यांतील भागीदारीचे हक्क हेमलता यांच्या नावावर केले होते. यात अवंत वेंचर्स एलएलपी कंपनीत हर्ष यांची २० टक्के तर, ऐश्वर्या अवंत बिल्डर्स एलएलपी कंपनीत १० टक्के भागीदारी आहे. हेमलता यांनी कंपनीच्या भागीदारांना विचारणा केली असता त्यांनी पतीच्या मृत्यूनंतर त्यांचा कसलाही अधिकार नसल्याचे सांगितले. अखेरीस हेमलता यांनी पोलिसांत तक्रार दिली. सुदीपकुमार साह यांनी भरपाईची रक्कम म्हणून त्यांना १६ कोटी रुपयांचा धनादेश दिला. मात्र, तो बँकेत वठला नाही.