Join us

टोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई?; एमईपी कंपनीचा पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 5:53 AM

मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे एमएसआरडीसीने ऐरोलीसह मुलुंड चेकनाका येथील दोन असे तीन टोलनाक्यांवरून जाणाऱ्या लहान (हलक्या) वाहनांना टोलमधून मुक्त केले आहे.

- जितेंद्र कालेकर ठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे एमएसआरडीसीने ऐरोलीसह मुलुंड चेकनाका येथील दोन असे तीन टोलनाक्यांवरून जाणाऱ्या लहान (हलक्या) वाहनांना टोलमधून मुक्त केले आहे. यातून पैसा आणि वेळही वाचणार असल्यामुळे ठाणे आणि मुंबईतील वाहन चालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर टोल वसूली करणारी ‘एमईपी’ खासगी संस्था मात्र यातून बुडणाºया सात ते दहा कोटींच्या उत्पन्नाची भरपाई राज्य सरकारकडे मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंब्रा येथे बायपासचे काम महिनाभर लांबणीवर गेले आहे. वाहतुकीचा हा ताण ठाणे शहर आणि ठाणे ते मुंबई तसेच मुंबई ते ठाणे जाणाºया वाहतुकीवर आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून शहरात वाहतूककोंडीचे चित्र होते. यातून ठाणेकरांची सुटका होण्यासाठी एमएसआरडीसीचे मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन ऐरोलीसह मुलुंड चेकनाका आणि कोपरी आनंदनगर अशा तीन्ही टोल नाक्यावरुन टोल वसूलीतून लहान वाहनांना मुक्त केले आहे. ही टोल माफी २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबर २०१८ या दरम्यान असले. त्यामुळे चालकांना महिनाभर टोल भरावा लागणार नाही. मंगळवारी मध्यरात्रीपासून अमलात आलेल्या निर्णयामुळे केवळ मोठ्या वाहनांनाच टोल भरावा लागणार आहे. पण ज्यांना अजूनही याची पूर्ण माहिती नाही. ते मंगळवारी टोल भरण्यासाठी टोलच्या केबिनजवळ काही सेकंद गाडी उभी करीत होते. त्यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.एकाच मिनिटात १६० वाहने सुसाटटोल माफी झाल्यानंतर कोपरीच्या आनंदनगर जवळील मुलुंड टोलनाका येथील एका मार्गिकेवरून एका मिनिटाला २५ लहान (कार) वाहने गेली. याच न्यायाने चार मार्गिकांवरून जाणारी १०० वाहने येथून गेल्याचे आढळले तर मुंबईकडून ठाण्याकडे येणारी एका मिनिटात १५ वाहने येत होती. याच न्यायाने चार मार्गिकांवरुन ६० वाहनांनी टोल न भरता प्रवेश केला. दिवसभरात अशी हजारो वाहने या मार्गावरून गेली.कायमची टोलमाफी व्हावी - अनंत तरेटोलमुक्तीचे वाहनचालकांच्या वतीने शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे. ही टोलमुक्ती केवळ एक महिना नव्हे तर कायमस्वरुपी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.गेल्या २२ वर्षातील ठाणे ते नवी मुंबईच्या टोलचा हिशेब केला तर दुसरा नवीन पूल उभा राहू शकला असता इतका टोल वसूल झाल्याचा टोलाही त्यांनी शिवसेना -भाजपच्या मंत्र्यांना लगावला.

रोज किती वाहने जातात, किती महसूल जमा होतो, याची माहिती रोज एमएसआरडीसीकडे आहे. शिवाय, रोज यात आकडेवारी बदलत असते. पण एक महिन्याच्या टोल माफीतून एमइपीला सात ते दहा कोटींचा फटका बसणार आहे. हा क्लेम राज्य सरकारशी चर्चा करून केला जाणार आहे.- जयंत म्हैसकर, व्यवस्थापकीय संचालक, एमईपी, (रस्ता दुरुस्ती आणि टोल वसुलीचे प्रमुख ठेकेदार) मुंबई.

टोल माफी मिळण्यापूर्वी केवळ टोल भरण्यासाठी मुलुंड येथे एक तास वाहतूककोंडीमध्ये वाया जात होता. दहा मिनिटांच्या प्रवासाला तासभर लागायचा. रोज भांडूप येथून मला ठाण्यात यावे लागते. वाहतूककोंडीला कंटाळून मी दुचाकीवरून येत होतो. या टोल माफीमुळे वेळ वाचेल. या निर्णयामुळे खूप समाधान वाटले. - निलेश रावराणे, भांडूप.माझे क्लिनिक ठाण्याच्या आनंदनगर येथे आहे. राहायला घोडबंदर रोडवर असल्यामुळे हा मार्ग रोजच्या प्रवासाचा आहे. मुंबईत विक्रोळीकडे जातानाही दीड तास खर्च होत होता. तात्पूरती केलेली टोलमाफी कायमची व्हावी, अशी अपेक्षा आहे. - डॉ. नितीन माने, कोपरी, ठाणे.मासिक पास धारकांचे काय? हलक्या वाहनांना २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबर २०१८ या कालावधीत टोलमाफी दिली आहे. पण ज्यांनी मासिक पास काढला आहे. अशा चालकांना मुदतवाढ मिळणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :टोलनाकामुंबई