घोडबंदर : वागळे, नौपाडा, उथळसर आणि माजिवडा, मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील विविध अंतर्गत रस्त्यांवरील खोदलेले चर बुजवण्यासाठी ठाणे महापालिका १० कोटी २३ लाख ९१ हजार ७५ रुपयांचा खर्च करणार असून या कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. वागळे प्रभाग समितीमध्ये ४ कोटी २० लाख २९ हजार ६०० रुपये खर्च येणार आहे. हे काम १.८० टक्के कमी दराने मे. शंकर महादेव आणि कंपनी करण्यास राजी झाली आहे. नौपाड्यात १८०० मीटर लांबीचे चर बुजवण्यासाठी २३ लाख ७३ हजार खर्च येणार असून एएनए कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांनी ४.५० टक्के कमी दराने निविदा भरली आहे. माजिवड्यामध्ये मे. सह्याद्री कन्स्ट्रक्शनने पाच टक्के कमी दराने निविदा भरली असून, ३ कोटी ६६ लाख १३ हजार ४७५ रुपये खर्च करून काम करणार आहे. उथळसरमधील कामाचा ठेका मे. स्वस्तिक इन्फ्रा लॉजिक प्रा. लि. यांना मिळाला. यासाठी २ कोटी १३ लक्ष ७५ हजार खर्च होणार आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी ठेकेदारांवर असल्याने पावसाळ्यातील खड्डे या कामामुळे दिसणार नाहीत, अशी प्रशासनास अपेक्षा आहे. (वार्ताहर)
रस्त्यांवरील चर बुजवण्यास १० कोटींचा खर्च
By admin | Published: May 24, 2014 1:27 AM