लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मान्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्याने उत्तराखंडपासून लगतच्या प्रदेशात पूरस्थिती निर्माण झाली असतानाच दुसरीकडे मात्र मुंबईसह राज्यभरात पावसाने मोठा ब्रेक घेतला आहे. पावसाची ही विश्रांती किमान २० ऑगस्टपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर कदाचित पाऊस पुन्हा सुरू होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.
अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, गेल्या ७ दिवसांत राज्यात जवळपास पाऊस पडलेला नाही. मराठवाड्यातील अनेक जिल्हे सामान्य पावसाच्या स्थितीपेक्षा कमी आहेत. शेतीसाठी हा चिंतेचा मुद्दा आहे. कारण परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहण्याची शक्यता आहे. निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले की, मुंबईत आणि राज्यात कुठेही सध्या पावसाची चिन्हे नाहीत. मान्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे तेथील प्रदेशात भरपूर पाऊस आणि पूरसदृश स्थिती आहे.
चांगला पाऊस : मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, पालघर आणि नांदेड याच जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. उर्वरित जिल्ह्यात सरासरी पाऊस झाला असून, तोदेखील तुटीत आहे.
पावसाची तूट सातारा, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली, अकोला आणि अमरावती हे जिल्हे आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या जिल्ह्यात पावसाची तूट आहे. २० ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची चिन्ह नाहीत. मुंबईत फार काही मोठा पाऊस पडणार नाही.
आणखी पाऊस हवा...मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. सध्या मुंबईत अधून मधून पावसाची एखाद दुसरी मोठी सर कोसळत असली तरी देखील माेठ्या पावसासाठी देखील मुंबईकरांना आठवडाभर वाट पहावी लागणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरून वाहू लागल्यानंतर मुंबई महापालिकेने लागू केलेली दहा टक्के पाणी कपात आता मागे घेतली आहे. मात्र मुंबईकरांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा निर्माण होण्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पुरेशा पावसाची गरज भासणार आहे.