लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बँकेकड़ून आधार कार्ड नोंदणीसाठी नेमलेला ऑपरेटर दलालाच्या मदतीने कागदपत्रांंशिवाय बनावट आधार कार्ड बनवून देत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आली होती. तपासात या टोळीने १० नेपाळी नागरिकांना बनावट आधार कार्ड बनवून दिल्याचे समोर येताच त्यांनाही अटक करण्यात आली.
बोरीवली पश्चिमेकडील चामुंडा सर्कल येथे असलेल्या कॅनरा बँकेत हा प्रकार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ११चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांना मिळाली. त्यानुसार, पथकाने अधिक तपास केला. त्यात कॅनरा बँकेत आधार कार्ड नोंदणीची सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे अधिकृत सेंटर कार्यरत असून, तेथे ऑपरेटर नेमलेला आहे. तो दलालाच्या मदतीने बँकेतील अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून, नातेवाईक म्हणून स्वतःला दाखवत, बनावट आधार कार्ड बनवून देत असे. या प्रकरणी ऑपरेटर विनोद चौहान आणि उमेश चौधरी यांना अटक केली आहे.
या टोळीने बनावट कागदपत्राच्या आधारे १० नेपाळी नागरिकांना आधार कार्ड बनवून दिल्याचे तपासात स्पष्ट होताच, त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १२ मोबाइल फोन, संगणक, प्रिंटर, डेबिट, क्रेडिट कार्ड, बनावट ओळखपत्र, कॉलेज प्रमाणपत्र जप्त करण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे. अटक आरोपींना १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.