Join us  

अबब! मालाडमध्ये इमारतीत आढळला १० फूटाचा अजगर; स्थानिकांची उडाली भंबेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 5:34 PM

जवळपास २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा अजगर पकडण्यात सर्पमित्राला यश आले.

मुंबई – शहरातील मालाड येथे रहिवाशी वस्तीत भला मोठा अजगर सापडला आहे. तब्बल १० फुटाचा हा अजगर इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये लपला होता. मालाडच्या काचपाडा येथील ही घटना आहे. रात्री ८.३० च्या सुमारास स्थानिकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी सर्पमित्राला फोन करून बोलावले. सुरुवातीला हा साप असल्याचे लोकांना वाटले.

रेस्क्यू कॉल आल्यानंतर सर्पमित्र अजिंक्य पवार १० मिनिटांत घटनास्थळी पोहचले. त्यांनी सापाला पाहिले तेव्हा हा साप नसून अजगर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर अजगराला कुठलीही इजा होऊ नये अथवा शॉक लागू नये यासाठी खूप प्रयत्न केले. जवळपास २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा अजगर पकडण्यात सर्पमित्राला यश आले. १० फुटी हा अजगर रहिवाशी वस्तीत ड्रेनेज लाईनमधून आल्याचा अंदाज सर्पमित्र अंजिक्य पवार यांनी वर्तवला. या अजगराला सुखरुप पकडून त्याला बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क येथे वन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

अजगर (Rock Python) हा जगात सगळीकडे सापडतो. हा सर्प जातीतील सर्वात मोठा बिनविषारी सर्प आहे. पायथॉन मोलुरस या जातीचे शास्त्रीय नाव आहे. याला रॉक पायथॉन असंही म्हटलं जाते. या सापाची लांबी १६ फुटापर्यंत वाढते. या सर्पाचे वैशिष्ट म्हणजे प्रथम तो भक्ष्यावर झडप मारून त्यास पकडतो. त्यानंतर त्याभोवती शरीराची वेटोळी गुंडाळून आवळत राहतो. भक्ष्याला हालचालच नव्हे, तर श्वासदेखील घेण्यास अडचण होते. अशा रीतीने जखडून भक्ष्याला गुदमरून मारतो. त्यानंतर त्याला डोक्याच्या बाजूने गिळण्यास सुरुवात करतो.

टॅग्स :साप